Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मांगली येथील शेतकऱ्याने केली ड्रोन द्वारे फवारणी

भद्रावती तालुक्यातील ठरला पहिला प्रयोग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्यातील मांगली येथील किशोर भोस्कर या शेतकऱ्याने पारंपारिक पिकाला फाटा देत शेतात उसाची लागवड केली. उसावर व धान पिकावर ड्रोन द्वारे फवारणी करून शेतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला जवळ केले. आपल्या पिकांवर ड्रोनने फवारणी करणारे किशोर भोस्कर हे तालुक्यातील पहिले शेतकरी ठरले आहे.

भद्रावती येथील ठेकेदार किशोर भोस्कर यांनी मांगली गावात काही वर्षांपूर्वी शेती विकत घेतली व शेतीचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी शेती व्यवसाय सुरू केला. प्रारंभी काही वर्षे त्यांनी कापूस, सोयाबीन, धान यासारखी पारंपरिक पिके आपल्या शेतात घेतली. मात्र नवनवीन प्रयोग व शेती क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे त्यांचा नेहमी कल असल्यामुळे ते शेतीत नवनवीन प्रयोग करीत राहिले.

यावर्षी त्यांनी आपल्या शेतात उसाची लागवड करण्याची ठरविले. त्यानुसार पूर्ती साखर कारखान्याशी आवश्यक तो करार करून पाच एकर शेतात उसाची लागवड केली. त्यांचा हा ऊस लागवडीचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. सध्या त्यांच्या शेतातील ऊस जोमाने वाढला असून त्याची उंची सात फुटापर्यंत गेली आहे. या उसावर फवारणी करण्यासाठी त्यांनी ड्रोन चा अवलंब केला. ड्रोन द्वारे फवारणी करण्यासाठी त्यांना उसासाठी आठशे रुपये प्रति एकर तर इतर पिकांसाठी सहाशे रुपये प्रति एकर खर्च आला. ड्रोन द्वारे फवारणी ही इतर फवारणी पेक्षा प्रभावी होत असल्याचा किशोर भोस्कर यांचा अनुभव असून या फवारणीमध्ये कीटकनाशके तथा अन्य औषधीची बचत होत असल्याचे भोस्कर यांनी सांगितले. आजच्या युगात एकीकडे शेतीपासून दूर जात असलेले लोक पाहिले मात्र शेतीचा कोणताही अनुभव नसताना किशोर भोस्कर यांनी शेती व्यवसायही यशस्वी करून दाखविला आहे. त्यामुळे इतरांपुढे ते आदर्श ठरले आहे.

“पारंपारीक शेतीमधे म्हणावे तसे उत्पन्न नाही.शेती व्यवसायात यशस्वी होण्यासाठी नेहमी नवनवे प्रयोग करुन अत्याधुनिक तंत्राचा वापर केला पाहिजे. असे केल्यास शेतीतुनही निश्चित असे उत्पन्न काढता येते.”

किशोर भोस्कर,मांगली.
प्रयोगशील शेतकरी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये