माराईपाटण शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन
लोकसहभागातून शाळेच्या विकासाचा संकल्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माराईपाटण येथे पालकांच्या उत्स्फूर्त सहभागातून शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प नवनिर्वाचित समितीने व्यक्त केला.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रल्हाद महादू काळे, तर उपाध्यक्षपदी इंदिराताई किष्टु कोटनाके यांची निवड करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक अतुल मनोहर गोस्वामी हे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
समितीच्या सदस्यपदी नर्मदा विनोद वाघमारे, अनिल लव्हराळे, प्रदीप काळे, गणपती येमे, धनश्री कांबळे, दैवशाला सोनकांबळे, जंगुबाई सिताराम कोटनाके आणि भागवत कांबळे यांची निवड करण्यात आली. याशिवाय दोन विद्यार्थी प्रतिनिधी आणि एका शिक्षक प्रतिनिधीचीही निवड करण्यात आली.
त्यामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या तिन्ही घटकांचा शाळेच्या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग राहणार आहे.
लोकसहभागातून शाळेच्या विकासाचा निर्धार
शाळेला शासनाकडून अपेक्षित स्वरूपात अनुदान उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प केला.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे, शाळेच्या भौतिक सुविधा सुधारणे, तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्यासाठी ग्रामस्थ, पालक आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने लोकसहभागातून विकासकामे करण्याचा समितीचा मानस आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्तावाढ, विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास या बाबींना समितीच्या कार्यकाळात प्राधान्य दिले जाणार आहे.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिक्षक प्रतिनिधी यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.“लोकसहभागातून शाळेचा विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास” हा ध्यास घेऊन नवीन शाळा व्यवस्थापन समिती सक्रियपणे कार्य करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



