ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार : अतिक्रमण नोटीसमध्ये तक्रारदाराचे नाव उघड केल्याने वाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना येथील एका नागरिकाने नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्र्यांना  तक्रार केली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी दिलेल्या नोटीसमध्ये मुख्याधिकारी यांनी तक्रारदाराचे नाव उघड केल्यामुळे वैयक्तिक विरोध वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहब्बत खान यांनी कोरपना येथील मुख्य बस स्टॉप चौकातून शहराकडे जाणारा  मुख्य मार्गावर झालेल्या अतिक्रमण संदर्भात नगरपंचायतीकडे अतिक्रमण हटवण्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर, मुख्याधिकारी श्री.येमाजी धुमाळ  यांनी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली. मात्र, या नोटीसमध्ये तक्रारदाराचे नाव स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते, ज्यामुळे तक्रारदार संतप्त झाले आहेत.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, प्रशासकीय नियमांनुसार सार्वजनिक हितासाठी केलेल्या तक्रारींमध्ये तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवणे बंधनकारक असते. असे असताना, मुख्याधिकारी यांनी त्यांचे नाव उघड करून गोपनीयतेचा भंग केला आहे. यामुळे अतिक्रमणधारकांकडून त्यांना वैयक्तिक त्रास किंवा संभाव्य धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कृतीमुळे मुख्याधिकारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून, अतिक्रमणधारकांशी माझा वैयक्तिक संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकारी यांच्यावर तात्काळ सखोल चौकशी करून योग्य ती प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मुख्यमंत्री यांच्याकडून  यावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे भविष्यात नागरिकांना सार्वजनिक हितासाठी तक्रार करण्यास प्रोत्साहन मिळेल की नाही, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये