ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी आतापासून चारा उत्पादनाचे नियोजन करा – जिल्हाधिकारी पंत

चारा पिकांची लागवड व नियोजनाबाबत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

नियोजन भवन येथे (दि.३०) कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दुष्काळी परिस्थितीत चारा पिकांची लागवड व नियोजन या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता जलेश सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, विभागीय वन अधिकारी राजन तलमले आदी उपस्थित होते.

चारा लागवडीसाठी योग्य जागांची आतापासूनच निवड करून ठेवा, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या अभिसरणातून मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादनाला प्राधान्य द्यावे. दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ यंदाच्या दुष्काळापुरते मर्यादित न राहता नियमित व शाश्वत चारा उत्पादनाची व्यवस्था निर्माण करावी. जेणेकरून चारा उत्पादनातून शेतकरी आणि पशुपालकांना अतिरिक्त उत्पन्न कसे मिळेल, याचाही विचार करता येईल.

चारा उत्पादनाबाबत आधुनिक तंत्रज्ञान, उपलब्ध संसाधने आणि विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चारा लागवड, उत्पादन व व्यवस्थापनाबाबत असलेल्या शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन करून घ्यावे. तसेच प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन शेतकरी, पशुपालक आणि संबंधित यंत्रणांना मार्गदर्शन करावे. यासाठी सर्व विभागांचे सहकार्य आणि समन्वय आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तज्ज्ञांकडून चारा व्यवस्थापन व मूल्यवर्धनाबाबत मार्गदर्शन :

कार्यशाळेत पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे यांनी ‘चंद्रपूर जिल्ह्यातील चारा टंचाई व्यवस्थापन व शाश्वत चारा विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन डॉ. विलास गावखरे यांनी ‘चाऱ्याचे भौतिक प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन’ या विषयावर माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश अघळते यांनी ‘चारा व्यवस्थापन व कृषी वनीकरण’ या विषयावर, तसेच विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन योजनेच्या माध्यमातून चारा लागवड व अझोला उत्पादनाच्या संधींबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे यांनी माहिती दिली. विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचे डॉ. निशांत नांदेश्वर यांनी दुग्धविकास प्रकल्पांतर्गत उपलब्ध योजनांबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेमध्ये, कमतरता भासणाऱ्या चारा पिकांची निवड, दुष्काळी व कमी पाण्याच्या परिस्थितीत जलद वाढणारी आणि कमी पाण्यावर येणारी चारा पिके (उदा. ज्वारी, बाजरा, मका, नेपियर गवत, लसूण घास इ.) यांची लागवड पद्धती, चारा संवर्धन व साठवणूक तंत्रज्ञान, अतिरिक्त उपलब्ध चाऱ्याचे मुरघास बनवणे, कडबा कुट्टी करणे आणि योग्य साठवणूक करून चाऱ्याची नासाडी थांबवण्याच्या आधुनिक उपाययोजना या विषयांवरसुध्दा चर्चा करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये