सुवर्णकन्या रिंकू रॉय आणि रौप्यपदक विजेता निमिष पुरीचा गडचांदूरमध्ये ‘अराईज जिम’तर्फे सत्कार!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर : अराईज जिमच्या वतीने महाराष्ट्र स्टेट फेडरेशन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या प्रतिभावंत खेळाडूंसह वेट लॉस व वेट गेन स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर नगर परिषदेचे अध्यक्ष निलेश भाऊ ताजने होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीनिवास सोनटक्के, फारुक भाई कादरी, प्रा. मुंडे, प्रा. डॉ. पानघाटे आणि स्वप्निल देवाळकर उपस्थित होते.
महाराष्ट्र स्टेट फेडरेशन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील सब-ज्युनिअर गर्ल्स अंडर-१७ गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या कु. रिंकू रॉय हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे वडील डॉ. रॉय यांना शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच, याच स्पर्धेतील सब-ज्युनिअर बॉईज अंडर-१७ गटात रौप्यपदक मिळविणाऱ्या निमिष पुरी याचाही सत्कार करण्यात आला. त्याचे वडील उद्धव पुरी यांना शाल देऊन गौरविण्यात आले.
अराईज जिमतर्फे आयोजित वेट लॉस स्पर्धेतील विजेता हसनैन शेख आणि वेट गेन स्पर्धेतील विजेती कु. प्रियंका मोहारे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या सर्व यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे अराईज जिमचे संचालक व प्रशिक्षक गौरव भटारकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन व आभार प्रदर्शन प्रा. जहीर सैय्यद यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम मारपकवार, शशी सर आणि तन्वीर राय यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सत्कार समारंभातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या यशाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.



