ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात १४ आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट *राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : शहरातील एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी (भा.पो.से.) यांनी केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रथमतः १० आरोपींना पकडून त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेतल्यानंतर ९ ऑगस्टला पुन्हा ४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्व १४ आरोपींना २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून, फुस लावून देहव्यापारात जबरदस्तीने ओढणाऱ्या व अल्पवयीन मुलीशी तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या शहरातील विविध भागातील ९ आरोपींवर वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.आरोपींवर अपराध क्र.६२६/२०२३ कलम ३६३, ३७० (अ) ३७६, ३७६ (२) एन ३७६(३) भादंवि सहकलम ४,६, बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ सहकलम ३, ४, ५, ६ , स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात अधिक तपासासाठी ८ जणांची एसआयटी टीम गठीत करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यातील अल्पवयीन गरीब पीडित मुलगी पारिवारिक सदस्यांना सोडून काही दिवसांपूर्वी आपल्या घरातून बाहेर निघाली होती. वरोरा शहरात आल्यानंतर आरोपी मुलीची नजर तिच्यावर पडली.तिने अल्पवयीन पीडित मुलीला आपल्या घरी ठेवून घेतले. त्यानंतर या गुन्ह्यातील अन्य दलाल आरोपीने पीडित मुलीला देहव्यापार करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले. तिने नकार दिल्यानंतर दोन्ही वयस्क आरोपींनी संगनमताने पैशाचे आमिष दाखवून देह विक्री करण्यास बाध्य केले. तद्नंतर सदर आरोपी मुलगी व दलाल आरोपी हे दोघे इतर अटक आरोपींशी संपर्क करून त्यांच्याकडून रक्कम घेऊन पीडितास देहविक्री करण्यास व ग्राहकासोबत जाण्यास भाग पाडत असे. आरोपीसोबत पीडिताला पाठविल्यानंतर ते पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होते, असे कळते. यातील आरोपींकडून वारंवार होत असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविल्याने आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यातील एक आरोपी अन्य गुन्ह्यात कारागृहात असल्याचे समजते. बाकीच्या सर्व आरोपींना विशेष न्यायाधीश तथा अपर सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात पेश केल्यावर तसेच त्यांना घटनेचे गांभीर्य पटवून दिल्यावर न्यायाधीशांनी आरोपींना ९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावला होता. यादरम्यान आणखी ४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याच प्रकरणात असेही कळते की, घटनेतील एका आरोपीने चाकुचा धाक दाखवून पीडितावर बलात्कारच केला नाही तर तिच्या जवळचे २ हजार रुपये सुद्धा हिसकले. एकाने अल्पवयीन मुलीवर गाडीतच बलात्कार केला. अन्य एका आरोपीने मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार तर केलाच शिवाय आपल्या इतर मित्रांनाही बोलावून घेतले . त्या सर्वांनी मिळून मुलीवर गँगरेप केला.यातील एका प्रकरणाचा व्हिडिओही बनविण्यात आला. या प्रकरणात एसआयटी टीमला तपासात आढळलेले कृत्य समाजमन मन सुन्न करणारे असल्याचे कळते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भादंवि ३७६ डीए आणि १६ पॉस्को कलम अतिरिक्त जोडले असल्याचे कळते.
१० आरोपींचा ९ ऑगस्ट २३ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड होता. पोलिसांनी आणखी ४ आरोपींना ताब्यात घेतल्याने सर्व १४ आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले गेले असता त्यांना बघण्यासाठी न्यायालय परिसरात एकच गर्दी उसळली होती.
यातील सर्व १४ आरोपींना न्यायाधीशांनी २२ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावला आहे. या प्रकरणात काही आरोपी अटकेच्या धाकाने फरार असल्याचे कळते.

*आमची मुले निर्दोष: पारिवारिक सदस्यांचा टाहो*
अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपींचे पालक, नातेवाईक तथा स्थानीय नेता यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीडित अल्पवयीन मुलीचा वयाचा दाखला सादर करावा, असे म्हणत आमची मुले निर्दोष असल्याचा टाहो त्यांनी फोडला.

*कार्यवाही कायद्यानुसारच : पोलीस विभाग*

अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात झालेली कार्यवाही कायद्यानुसार करण्यात आली आहे. काही स्थानिक नेते स्वतः च्या स्वार्थासाठी या घटनेत ‘ ते हे नव्हेच ‘ अशी भूमिका घेऊन स्वस्त प्रसिद्धी व समाजाची सहानुभूती मिळविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करीत आहे.
या प्रकरणात योग्य शहानिशा करूनच दोषी आढळलेल्यांविरुद्ध सबळ पुराव्यानिशी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलीवर झालेली लैंगिक अत्याचाराची घटना समाजमन सुन्न करणारी आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींवर विविध प्रकरणात गुन्हेही दाखल आहेत. तरीही काही व्यक्ती जाणूनबुजून या ना त्या कारणाने पोलीस विभागाला बदनाम करण्याचा, त्यांची प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत,असे नमूद करीत शहरात शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी जनतेने मोलाचे सहकार्य द्यावे, असे आवाहनही पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये