ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूस नगर परिषदेचा इशारा: जीर्ण इमारतींची तात्काळ दुरुस्ती करा

अन्यथा अपघाताची जबाबदारी संबंधित मालकाची राहील

चांदा ब्लास्ट

घुग्घूस/चंद्रपूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घुग्घूस नगर परिषदेने शहरातील सर्व इमारत व घरमालकांसाठी महत्त्वाची सार्वजनिक सूचना जारी केली आहे. महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 च्या कलम 195(1) अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या सूचनेत जीर्ण व धोकादायक अवस्थेतील इमारतींची तात्काळ दुरुस्ती अथवा आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, एखाद्या घराची, इमारतीची किंवा तिच्या कोणत्याही भागाची अवस्था जीर्ण झाली असल्यास किंवा ती कोसळण्याची शक्यता असल्यास संबंधित मालकाने तात्काळ नगर परिषदेची परवानगी घेऊन धोकादायक भाग काढून टाकावा किंवा आवश्यक दुरुस्ती करावी. इमारतीचे पुनर्बांधकाम आवश्यक असल्यास, नियमानुसार प्रस्ताव नगर परिषदेकडे सादर करून आवश्यक परवानगी घेतल्यानंतरच बांधकाम सुरू करावे.

नगर परिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वतःच्या कुटुंबासोबतच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य द्यावे. विशेषतः रस्त्यालगत असलेल्या जीर्ण इमारतींमुळे पादचारी व नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे ही संबंधित मालकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी मिलिंद रंगणकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या सूचनेत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, संबंधित मालकांनी वेळेत आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे कोणतीही जीवितहानी, अपघात किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्यास नगर परिषद जबाबदार राहणार नाही.

नगर परिषदेने सर्व मालमत्ता धारकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आपल्या इमारतींची तात्काळ तपासणी करून आवश्यक दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना त्वरित कराव्यात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये