भद्रावती तहसिलला तात्काळ तहसीलदार नेमण्याची मागणी
शिवसेना पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तहसिल कार्यालयात तहसिलदार नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगारांना विविध महसुली कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत शिवसेना लोकसभा संघटक मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी, नियोजन सभापती राहुलभाऊ सोनटक्के, नगरसेवक गौरवभाऊ नागपुरे आणि नगरसेवक महेश जीवतोडे यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन सादर करून तातडीने तहसिलदाराची नियुक्ती करण्याची मागणी केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेमुळे उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, नॉन-क्रीमीलेयर आदी प्रमाणपत्रांची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. मात्र, तहसिलदार नसल्यामुळे ही कामे वेळेत होत नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शेतकरी, महिला, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांची अनेक महसुली कामे प्रलंबित राहिली आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी भद्रावती तहसील येथे तात्काळ तहसिलदाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.



