भद्रावतीतील गड्डमवार लेआउट परिसरात बिबट्याच्या वावर असल्याची चर्चा
वनविभागाकडून पिंजरा लावून सतर्कता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील गड्डमवार लेआउट परिसरात गेल्या एक-दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने तात्काळ दखल घेत परिसरात पिंजरा लावला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, अधिकृतरीत्या बिबट्याच्या उपस्थितीची पुष्टी अद्याप झालेली नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात बिबट्यासदृश पाऊलखुणा आढळल्या आहेत. मात्र, याबाबत वन विभागाकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
वन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अनावश्यक गर्दी टाळण्यास सांगितले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, तसेच लहान मुले व पाळीव जनावरांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद हायस्कूलच्या मागील परिसरात बिबट्याने एका डुकराची शिकार केल्याची घटना घडली होती. तसेच गवराळा वॉर्ड, रेल्वे स्टेशन परिसरात एका इसमाने बिबट्याच्या हल्ल्याचा दावा केला होता. मात्र, तो प्रकार बनाव असल्याचे पुढे स्पष्ट झाले.
वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी नागरिकांना अफवांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, बिबट्याच्या उपस्थितीची अधिकृत पुष्टी झाल्यास त्याला सुरक्षितरीत्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.



