दारू पिऊन ऑटो चालविणाऱ्या चालकावर वर्धा वाहतूक पोलिसांची कारवाई
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बजाज चौक येथे वाहन तपासणी दरम्यान दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या एका ऑटो चालकावर कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बजाज चौक येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार रियाज खान, पोहेवा किशोर पाटील व पोशी दिलीप कामडी यांनी एका ऑटोची तपासणी केली. ऑटो चालक श्रावण ताराचंद शंभरकर (वय ४२, रा. बोथुडा ता. जि. वर्धा) हा भरधाव वेगाने व झिगझॅग पद्धतीने ऑटो चालवित असल्याचे निदर्शनास आले.
वाहतूक नियंत्रण शाखेच्या डिजिटल अल्कोहोल विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी केली असता चालकाच्या शरीरात मद्याचे प्रमाण २२९.२ मिग्रॅ/१०० मिली आढळून आले. त्यानंतर संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
वाहतूक नियंत्रण शाखेने दिलेल्या माहितीनुसार, चालू वर्षात आतापर्यंत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १५८ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी केले आहे.



