लेंडाळा तलावातील हजारो मासे मृत्युमुखी
सौंदर्यीकरणाच्या कामाचा फटका मच्छीमारांना : लाखोंचे नुकसान, शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर संकट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि अनेक मच्छीमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या लेंडाळा तलावात सध्या हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली आहे. तलावाच्या सौंदर्यीकरण व खोलीकरणाच्या कामासाठी पाण्याचा साठा कमी करण्यात आल्याने हजारो मासे प्राणवायूअभावी मृत्युमुखी पडत असून, यामुळे पारंपरिक मत्स्य व्यवसायावर मोठे संकट कोसळले आहे.
आमदार करण देवतळे यांच्या विशेष प्रयत्नातून लेंडाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध झाला असून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरवासीयांना भविष्यात एक सुंदर, स्वच्छ आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ मिळावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मात्र, या विकासकामादरम्यान मत्स्यसंपदेचे होणारे नुकसान आणि मच्छीमारांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्यानंतर अनेक मासे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. उर्वरित पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने तलावात प्राणवायूची कमतरता निर्माण झाली. परिणामी हजारो मासे मृत्युमुखी पडत असून तलाव परिसरात दुर्गंधीयुक्त चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शिल्लक मासे पकडणेही अत्यंत कठीण झाले आहे.
लेंडाळा तलाव हा केवळ जलस्रोत नसून तो मत्स्य व्यवसायाशी निगडित शेकडो कुटुंबांच्या जीवनाचा आधार आहे. मच्छिंद्र मच्छुआ सहकारी संस्थेच्या माध्यमातून सुमारे २०० सभासद कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला या तलावातील मत्स्यसंपदा हातभार लावत होती. आज मात्र या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
प्रत्यक्ष पाहणीत तलावातील मोठ्या प्रमाणातील मासे मृत झाल्याचे दिसून येत असून, अंदाजे १० ते १५ लाख रुपयांच्या मत्स्यसंपदेचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे संस्थेला अपेक्षित असलेल्या उत्पन्नावर पाणी फिरले असून किमान ५ लाख रुपयांचे थेट आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मच्छिंद्र मच्छुआ सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप मांढरे यांनी सांगितले की, “तलावाचे सौंदर्यीकरण हे निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र विकासकामांसोबत मत्स्यसंपदा आणि मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने संस्थेचे मोठे नुकसान झाले असून शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम झाला आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन योग्य मदत व भरपाई द्यावी.”
मच्छीमार बांधवांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, तलावातील मत्स्यसंपदेचे वैज्ञानिक पद्धतीने पुनर्वसन करण्यात यावे, मृत झालेल्या माशांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी तसेच भविष्यात अशा विकासकामांदरम्यान मत्स्य व्यवसायावर परिणाम होणार नाही यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात.
विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखताना मच्छीमारांच्या हक्कांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. लेंडाळा तलावाच्या सौंदर्यीकरणामुळे शहराला नवीन ओळख मिळणार असली, तरी त्या बदल्यात शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात येऊ नये, अशी अपेक्षा नागरिक आणि मच्छीमार व्यक्त करत आहेत.



