ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीस दलातील महिला अधिकारी व अंमलदारांसाठी ‘महिला आरोग्यविषयक’ विशेष कार्यशाळेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महिलांचे आरोग्य हा समाजाचा कणा आहे, विशेषतः पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिलांना आपल्या कर्तव्यासोबतच आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आव्हानात्मक असते. याच उद्देशाने आज दिनांक ०९ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० ते ११:३० या वेळेत आशीर्वाद हॉल, पोलीस मुख्यालय (PHQ), वर्धा येथे महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर एका विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला प्रमुख वक्त्या म्हणून शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेखा रायजादा मॅडम, डॉ. निलीमा जोशी मॅडम आणि डॉ. प्रविणा जैन मॅडम उपस्थित होत्या. या तिन्ही तज्ज्ञांनी महिलांच्या विविध शारीरिक व मानसिक आरोग्य समस्यांवर सखोल प्रकाश टाकला. कार्यशाळेत प्रामुख्याने बदलती जीवनशैली आणि त्यातून उद्भवणारे स्त्रीरोग. पोलीस दलातील कामाचा ताण आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम, योग्य आहार, व्यायाम आणि नियमित वैद्यकीय तपासणीचे महत्त्व, वयानुसार महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि घ्यावयाची काळजी. या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यशाळेला वर्धा पोलीस दलातील एकूण ०५ महिला पोलीस अधिकारी आणि ९५ महिला पोलीस अंमलदार अशा एकूण १०० महिला कर्मचारी उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी आपल्या शंकांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून निरसन करून घेतले.

पोलीस दलात काम करताना अनेकदा वेळेच्या अभावामुळे महिला कर्मचारी आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या आरोग्याप्रती जागरूक राहण्याचा संदेश देण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेले ‘बहुमूल्य मार्गदर्शन’ महिला कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये