आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकीत प्रश्‍नावर शिक्षणमंत्र्यांचे उत्तर

राज्‍यात १५ ऑगस्टपासून शिक्षक भरती प्रक्रिया

चांदा ब्लास्ट

राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्टपासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असे सभागृहात सांगितले. यामुळे टीईटी धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदे शासन भरत नसल्याने रिक्त जागांचा आकडा दरवर्षी वाढत असतो, काही जागा समायोजन प्रकियेने भरण्यात येत असल्या तरी रिक्त जागांचा अनुशेष भरून निघत नसल्याने याचा विपरित परिणाम या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. उच्‍च श्रेणी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्‍या पदोन्नतीचे पद व विस्‍तार अधिकारी व सहायक शिक्षकांची पदे कधी भरणार? व जिल्‍हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्‍वावर नियुक्‍ती करण्याबाबत ७ जुलै २०२३ रोजी काढलेले परिपत्रक रद्द करावे, असा प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी विचारला.

शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. आता कोर्टाने स्थगिती हटविली असून भरतीचे शेड्युल ठरवून दिले आहे. कोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्हापरिषद बिंदुनामावली कायम करून १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टलवर प्रकाशित करणार आहे. १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. त्यानुसार गुणवत्ता यादी १० ऑक्टोबरला प्रसिध्द होईल. त्यानंतर ११ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान नेमणुका देण्यात येईल. त्यानंतर २१ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरदरम्यान जिल्हा पातळीवर समुपदेशन करण्यात येईल. राज्यातील शिक्षकांची रिक्‍त पदे पवित्र प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू होत आहे. तथापि, मा. न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास अंतरीम स्थगिती दिली असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन तसेच पदभरतीसंदर्भात कार्यवाही करणे सद्य:स्थितीत शक्य नाही, असेही शिक्षण मंत्री दीपक केसरकर सांगितले.
तसेच जिल्‍हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्‍वावर करण्यात येणारी नियुक्‍ती ही तात्‍पुरत्‍या स्‍वरुपाची असून शिक्षकभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर नियुक्‍ती राहणार असल्‍याची माहिती तारांकीत प्रश्‍नावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शिक्षकभरतीची अनेक दिवसांपासून राज्‍यातील सुशिक्षीत बेरोजगार आतूरतेने वाट बघत हाेते. राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया १५ ऑगस्‍टपासून सुरू होणार असल्यामुळे टीईटी धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये