गोंडपिपरीत रॉयल्टीच्या नावाखाली ‘मुरुम’ तस्करीचा उच्छाद!
एकाच पासवर मारल्या जाताहेत ३-४ ट्रिपा. _महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि तस्करीने कळस गाठला असून, आता चक्क अधिकृत रॉयल्टीचा (TP) आधार घेत मोठ्या प्रमाणावर मुरुमाची चोरी केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वेंकटपूर परिसरातून मुरुमाची अवैध वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे नवे तंत्र तस्करांनी शोधून काढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरुम तस्कर रॉयल्टी फाडताना अतिशय चलाखी करत आहेत. रॉयल्टी पासवर उत्खनन स्थळापासून पोहचण्याच्या ठिकाणापर्यंतचा वेळ जास्तीत जास्त मिळावा यासाठी अंतर वाढवून दाखवले जाते. वेळेची ही मर्यादा वाढवून घेतल्यावर, तस्कर त्याच एका रॉयल्टी पासवर (TP) दिवसभरात तीन ते चार ट्रिपा मारत आहेत. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून तस्करांचे खिसे मात्र गरम होत आहेत.
गोंडपिपरीच्या मुख्य हायवेवर धावणाऱ्या अनेक ट्रॅक्टर आणि ट्रॉलीवर नंबर प्लेटचा पत्ता नाही. नियमानुसार गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस (GPS) असणे अनिवार्य असताना, अनेक वाहने या नियमाला हरताळ फासून खुलेआम धावत आहेत. विशेष म्हणजे, ज्या ट्रॅक्टरचे फोटो समोर आले आहेत, त्यावरही नंबर स्पष्ट दिसत नाहीत, तरीही पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
*तहसीलदारांच्या अनुपस्थितीचा घेताहेत गैरफायदा*
सध्या तहसीलदार मुख्यालयी किंवा सुट्टीवर असल्याचा फायदा अवैध रेती आणि मुरुम तस्करांनी उचलला आहे. वरिष्ठ अधिकारी क्षेत्रात नसल्याने कर्मचाऱ्यांचे या तस्करांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे तालुक्यात गौण खनिजाची लूट राजरोसपणे सुरू आहे. महसूल विभागाने आणि पोलीस प्रशासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून या विना नंबरच्या आणि एकाच रॉयल्टीवर अनेक फेऱ्या मारणाऱ्या ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे. जर तातडीने कारवाई झाली नाही, तर शासनाचा महसूल असाच लुटला जात राहील, हे निश्चित.



