ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यात सघन कापूस लागवडीवर भर देण्यात यावा – आमदार सुमित वानखेडे

सघन लागवड पद्धती व कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

4 हजार हेक्टरवर सामूहिक पद्धतीने राबविला जाणार प्रकल्प

वर्धा : इंडो कॉटन डेव्हलपमेंट असोसिएशनच्यावतीने, कृषी विभागाच्या सहकार्याने आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत सघन लागवड पद्धती व कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात सघन कापूस लागवडीवर भर देण्यात यावा, असे प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी आ.सुमित वानखेडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी उपस्थित होते. आमदार सुमित वानखेडे यांनी 40 गावांमध्ये प्रत्येकी 100 हेक्टर असे 4 हजार हेक्टरवर सघन लागवड पद्धतीने कापसाची लागवड करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्याचे क्लस्टर तयार करावे, असे सांगितले. सघन कापूस लागवड ही बाब नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून राबविण्यात यावी, असे देखील त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी कृषी विभाग आणि आत्माच्या सहकार्यने सघन लागवड पद्धतीसाठी शेतकऱ्याचे प्रशिक्षण, शेतीशाळा आणि अभ्यास दौरे घेण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे, असे सांगितले. डॉ.शुभ्रा देशपांडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. आयसीडीएचे उपाध्यक्ष डॉ.राजू ठाकरे यांनी स्वागतपर भाषण केले. उद्घाटनपर भाषण आयसीएआर सीआयसीआरचे संचालक डॉ.विजय वाघमारे यांनी केले.

तांत्रिक सत्रात सघन लागवड पद्धती आणि लागवड तंत्रज्ञान या विषयावर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जीवन कतोरे यांनी मार्गदर्शन केले. सघन लागवड पद्धती आणि कापूस विपणन या विषयावर वरिष्ठ तज्ज्ञ डॉ.गोविंद वैराळे यांनी मार्गदर्शन केले. कापसाच्या गुणवत्तेचे मापदंड व कापणीनंतरची व्यवस्थापन पद्धती याविषयावर वरिष्ठ तज्ज्ञ डॉ.के.पांडयेन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सघन लागवडीचा अनुभव आणि कापूस यांत्रिकीकरणाचे महत्त्व यावरही सविस्तर चर्चा केली.

विभागीय एकत्रीकरण व समूह सक्षमीकरणाद्वारे शेतकऱ्यांना कापूस पिकात उच्च घनता लागवड पद्धती आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन यांच्याशी जोडणे या विषयावर पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली. विविध विभागातील अधिकारी व तज्ज्ञांनी सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि मार्गदर्शन केले. शेवटी प्रश्नोत्तर सत्र व समारोपपर भाषण झाले. उपस्थित शेतकरी, कृषी अधिकारी व संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

सदर कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, स्मार्टचे नोडल अधिकारी रोहन झांजरे, जीवनोन्नती अभियानाचे व्यवस्थापक निरज नखाते, विदर्भ कॉटन असोसिएशनचे संचालक भावेश शहा यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये