मोकाट जनावरे सार्वजनिक रस्त्यावर सोडणाऱ्यांविरुद्ध वर्धा पोलिसांची कारवाई; गुन्हे दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक व वाहतुकीच्या ठिकाणी जनावरे मोकाट सोडल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासोबतच वाहनचालक, पादचारी तसेच इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्धा शहर पोलिसांकडून मोकाट जनावरांबाबत आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
वर्धा शहर पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर काही जनावरे कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखीशिवाय व नियंत्रणाशिवाय मोकाट अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. सदर जनावरे सार्वजनिक रस्त्यावर बसल्यामुळे तसेच रस्त्यावर फिरत असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या नुसार मा पोलिस अधीक्षक वर्धा श्री सौरभकुमार अग्रवाल यांचे आदेशान्वये कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
नमूद जनावरे त्यांच्या मालकांनी अथवा ताब्यात असलेल्या व्यक्तींनी योग्य देखरेख व नियंत्रण न ठेवता सार्वजनिक रस्त्यावर मोकाट सोडल्याचे निदर्शनास आल्याने, तसेच जनावरांना आवश्यक अन्न, पाणी व निवारा उपलब्ध करून न देता त्यांना उपासमार, तहान, अनावश्यक वेदना व त्रास होईल अशा परिस्थितीत सोडून दिल्याचे आढळून आल्याने, संबंधित अशा पशु पालकांविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर , रामनगर पोलीस स्टेशन आणि जिल्हा वाहतूक शाखा यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करून कलम 285, भारतीय न्याय संहिता, 2023
कलम 90(ए), महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951
कलम 11(1)(h) व 11(1)(i), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, 1960 अन्वये गुन्हे नोंद केले आहेत.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील महाडिक यांचे मार्गदर्शनात पोनी विलास पाटील जिल्हा वाहतूक शाखा ,पोनी नागेशकुमार चतरकर वर्धा शहर, पोनी पौर्णिमा राखोंडे पो स्टे रामनगर यांचे संयुक्त पथकाने केली आहे
वर्धा शहर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या मालकीची किंवा ताब्यातील जनावरे सार्वजनिक रस्ते, चौक अथवा वाहतुकीच्या ठिकाणी मोकाट सोडू नयेत. जनावरे मोकाट सोडल्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
— पोलीस स्टेशन वर्धा शहर जिल्हा वर्धा



