ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

थकीत वीजबिलामुळे १५ गावांची वेळवा ग्रीड पाणीपुरवठा योजना ठप्प

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई; ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरणात जबाबदारीवरून टोलवाटोलवी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

तालुक्यातील वेळवा केंद्रातून १५ गावांना पाणीपुरवठा करणारी जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ग्रीड पाणीपुरवठा योजना थकीत विद्युत बिलामुळे मागील १२ जानेवारीपासून बंद आहे. सुमारे ३० कोटी रुपये खर्चून २०२२ मध्ये कार्यान्वित झालेली ही महत्त्वाकांक्षी योजना ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ठप्प पडल्याने पंधरा गावांतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

‘हर घर जल’ या संकल्पनेतून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून ही योजना मंजूर झाली होती. २०२२ पासून जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होऊन नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला होता. मात्र, घाटकुळ येथील १३ लाख ४ हजार ६६० रुपये आणि वेळवा माल येथील ४ लाख ८९ हजार ८४० रुपये, असे एकूण १७ लाख ९४ हजार ५०० रुपयांचे विद्युत बिल थकीत राहिल्याने महावितरणने १२ जानेवारी ला वीजपुरवठा खंडित केला. परिणामी संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था ठप्प झाली आहे.

योजनेचा ताबा अद्याप जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित न झाल्याने वीजबिल भरण्याची जबाबदारी कोणाची, यावरून १३ ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात परस्परांकडे बोट दाखवले जात आहे. जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय कार्यालयाने योजनेत कोणताही निधी शिल्लक नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ठोस निर्णय झालेला नाही.

महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत असून पंधरा गावांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जुलै २०२४ मध्येही अशाच प्रकारे वीजबिल थकीत राहिल्याने योजना बंद पडली होती.

 तेव्हा जिल्हा परिषदेने ५ लाख रुपये भरून पाणीपुरवठा सुरू केला होता.

योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून दहा दिवसांपूर्वी सौरनिर्मिती सुरू झाली आहे. मात्र, जुनी थकबाकी निकाली न निघाल्याने महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्यास नकार दिला आहे. कोट्यवधींची योजना आणि काही लाखांच्या थकबाकीमुळे निर्माण झालेली पाणीटंचाई प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत असून तातडीने थकीत बिल भरून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.

विद्युत बिलाची थकबाकी प्रलंबित राहिल्यामुळे महावितरणकडून संबंधित पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. याबाबत कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पत्राद्वारे लेखी माहिती देण्यात आलेली आहे.

     – अशोक लोणारे, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, चंद्रपूर

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये