ब्रम्हपुरी नगर परिषदच्या सभापती पदासाठी पाच लोकांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी नगरपालिकेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर, काँग्रेस पक्षाने आता नगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. आज दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सभेत नगरपालिकेच्या पाच अत्यंत महत्त्वाच्या विषय समित्यांच्या सभापतींची अधिकृत निवड करण्यात आली. यामुळे शहराच्या विकासकामांना आता नवी दिशा आणि वेग मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा संपन्न झाल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांनी ही विशेष सभा बोलावली होती. या सभेमध्ये सुरुवातीला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतून प्रत्येक समितीसाठी सदस्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर, या सदस्यांमधून सभापतींची नावे निश्चित करून त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा पीठासन अधिकाऱ्यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम समिती सभापती म्हणून डॉ. नितीन उराडे आरोग्य सभापती मनोज कावळे नगररचना व नियोजन सचिन राऊत
पाणीपुरवठा व जलनिस्सारण सतीश हुमने तर महिला व बालकल्याण सभापती म्हणून बबीता आमले यांची वर्णी लागली आहे. नगराध्यक्षांसह २१ नगरसेवकांचे बलाढ्य संख्याबळ असल्याने, काँग्रेस पक्षाने या निवडीमध्ये अत्यंत समन्वय राखला. कोणताही वाद न होता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही प्रक्रिया पार पडली. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, स्वच्छ आरोग्य, शुद्ध पाणीपुरवठा आणि शिस्तबद्ध नगररचना या कामांना हे नवनियुक्त सभापती प्राधान्य देतील, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांनी सर्व नवनियुक्त सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील प्रशासकीय कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


