भद्रावती पोलिसांचा कोंबडा बाजारावर छापा : ५.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पैशाची बाजी लावून हारजितचा खेळ : ५ आरोपी अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा बरांज मोकासा येथील झुडपी जंगल परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कोंबडा बाजारावर भद्रावती पोलिसांनी1 धडक कारवाई करत पैशाची बाजी लावून सुरू असलेला हारजितचा जुगार उधळून लावला. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून घटनास्थळावरून एकूण ५,०३,५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २०.०१.२०२६ रोजी भद्रावती पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की काही इसम मौजा बरांज मोकासा येथील झुडपी जंगल परिसरात कोंबडा बाजार भरवून त्यावर पैशाची बाजी लावत हारजितचा खेळ खेळत आहेत. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पंच व पोलीस स्टाफसह घटनास्थळी पोहोचून लपत-छपत छापा टाकण्यात आला. छापा टाकताच काही इसम पोलिसांना पाहून पळून गेले, मात्र पाच आरोपींना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून सात दुचाकी वाहने, रोख रक्कम, दोन जखमी कोंबडे तसेच दोन लोखंडी धारदार कात्या असा एकूण ५,०३,५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्यात एकूण दहा आरोपी निष्पन्न झाले असून पाच आरोपी फरार आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
गौरव बबनराव रणदिवे, सुरेश दयाल सोनटक्के, शंकर राजाराम कांबळे, अरुण भावराव दुपारे (रा. बरांज मोकासा) आणि विकास महादेव पंडीले (रा. बेलोरा).
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भद्रावतीचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहायक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर यांच्यासह महेंद्र बेसरकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, अनुप आष्टुनकर, गोपाल आतकुलवार, खुशाल कावळे, संतोष राठोड व योगेश घाटोडे यांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला.
भद्रावती पोलिसांच्या या ठोस कारवाईमुळे अवैध जुगार व कोंबडा बाजार चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण झाला आहे.


