स्नेह नगर ओपनस्पेसमध्ये बेकायदेशीर बांधकाम
तात्काळ प्रभावाने काम थांबविण्याचे नगराध्यक्षांचे आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील नियोजित स्नेह नगर गृहनिर्माण संस्था सर्वे क्रमांक ४२९/३ येथील ओपनस्पेसमध्ये गेल्या १० ते १२ दिवसांपासून पक्के बांधकाम सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील एका व्यक्तीने हे बांधकाम सुरू केले असून, या ठिकाणी महावितरणची हायटेंशन लाईन असल्यामुळे हे काम अत्यंत धोकादायक ठरत आहे. मात्र ओपन स्पेस जागेत बांधकाम सुरू असल्यामुळे वार्डातील रहिवाशांनी या बांधकामास तीव्र विरोध दर्शविला आहे.
याबाबत सोमवारी सायंकाळी स्नेह नगर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक महेश जिवतोडे, नगरसेविका उषा जाधव यांच्यासह भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी, उपाध्यक्ष सुधीर सातपुते व नगर परिषद अधिकारी भुजंग पोटे उपस्थित होते. रहिवाशांनी या जागेबाबत टाऊन प्लॅनिंग मॅप उपलब्ध नसल्याचे सांगून बांधकामाबाबत संशय व्यक्त केला.
सर्वसाधारण नियमांनुसार हायटेंशन लाईनखाली कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीस तात्काळ सूचना पत्र देऊन त्यांच्याकडील कागदपत्रांची मागणी करावी, तसेच त्यांचेही म्हणणे ऐकून घ्यावे, असे निर्देश नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी दिले. यासोबतच जुन्या सर्व्हेयर कडून मोजणीची प्रत घेऊन नेमकी जागा कोणती आहे याची तपासणी करावी, असेही त्यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम सुरू करण्यात आल्याने ते तात्काळ प्रभावाने थांबविण्यात यावे, असे स्पष्ट आदेश नगराध्यक्षांनी यावेळी दिले.
यावेळी स्नेह नगर येथील रहिवासी पंकज कातोरे, देवानंद मेश्राम, विनोद निमजे, विठ्ठल आसुटकर, किर्ती लांडगे, नयन मेश्राम, अनिल मोडक, प्रमोद निमजे, देवानंद वानखेडे, रामदास बेले, रामकृष्ण डांगे, दिनेश मालवीय, मिलिंद कांबळे, मधू गोहणे, रूपेश सोमलकर, मोहन पिंपळशेंडे, रनदिप रामटेके, स्वप्निल उपरे, साहिल वांढरे, सुरज डाखरे आदी उपस्थित होते.
रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून, नियमबाह्य बांधकामामुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेता नगर परिषद कोणती भूमिका घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


