वानरांचा हैदोस आणि वन विभागाची मौनधारणा!
जनतेच्या जीवित-मालमत्तेशी सुरू असलेला धोकादायक खेळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
घरा-दारासह ईतरही वस्तुचे मोठे नुकसान
गावोगावी वानरांचा वाढता उपद्रव ही आज किरकोळ नव्हे तर गंभीर सामाजिक आणि प्रशासकीय समस्या बनली आहे. घरादारांवर धुमाकूळ घालणारे वानर, अंगणातील पळस, बागायती झाडे, फुलझाडे व वेली यांची सर्रास नासधूस करत आहेत. शेतकरी, गृहिणी, लहान मुले आणि वृद्ध नागरिक यांचे दैनंदिन जीवन भयग्रस्त बनले असताना वन विभाग मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.सावली शहरात गेली अनेक वर्षा पासून वानरांचा हौदोस सुरु असून त्यांचे प्रमाण दिवसागनिक वाढताना दिसते
दररोज घडणाऱ्या घटनांमधून वानरांचा उपद्रव केवळ आर्थिक नुकसानीपुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेकदा वानर थेट नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. हा प्रकार भविष्यात गंभीर अपघात किंवा जीवितहानीस कारणीभूत ठरला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नाचे उत्तर वन विभाग देणार का?
वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली सामान्य माणसाच्या सुरक्षिततेकडे होणारे हे दुर्लक्ष अत्यंत दुर्दैवी आहे. वानरांचे पुनर्वसन, पकड, स्थानांतर किंवा शास्त्रीय पद्धतीने नियंत्रणासाठी शासनाने ठोस उपाययोजना आखलेल्या असतानाही त्या प्रत्यक्षात का दिसत नाहीत? कागदोपत्री उपाययोजना आणि प्रत्यक्षातील उदासीनता यामधील दरी वाढत चालली आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ वारंवार तक्रारी करत असताना त्यांना केवळ आश्वासनांची पोकळी मिळत आहे. वन विभागाचे अधिकारी कार्यालयात बसून अहवाल लिहित राहणार की प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन समस्या सोडवणार, हा प्रश्न आज प्रत्येक नागरिक विचारत आहे.
वानरांचा बंदोबस्त त्वरित करण्यात यावा, नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, ही आता केवळ मागणी नाही तर जनतेची हाक बनली आहे. अन्यथा प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आवाज अधिक तीव्र होईल, याची दखल घेणे वन विभागासाठी अपरिहार्य ठरणार आहे एकंदरित गावात वानरांचा हौ
दोस सातत्याने वाढत असून मोठे नुकसान सामान्य जनतेला सहन करावे लागत आहे वानरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.



