घुग्घूसमध्ये देशी दारू भट्टीला विरोधाने उचलली कडक भूमिका
महिलांची, विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती
चांदा ब्लास्ट
घुग्घूस :_ शहरातील बहिरमबाबा नगर (प्रभाग क्र. 3) येथील सभ्य वस्तीमध्ये सुरू करण्यात येत असलेल्या देशी दारू भट्टीविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. घुग्घूस–वणी महामार्गालगत, तसेच हनुमान मंदिर व शिव मंदिराच्या अवघ्या 50 मीटर अंतरावर सुरू होणाऱ्या या भट्टीमुळे महिलांची, विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, या परिसरात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा बस-स्टॅण्ड आहे. दररोज मोठ्या प्रमाणात महिला, आई-बहीणी आपल्या मुलांना येथे सोडण्यासाठी येतात. भट्टी सुरू झाल्यास दारुड्यांच्या वावरामुळे महिलांना छेडछाड, अश्लील शिवीगाळ, तसेच इतर असामाजिक घटनांचा धोका निर्माण होईल.
नागरिकांनी पुढे सांगितले की—
शाळकरी मुलांचा बस-स्टँड भट्टीच्या अगदी जवळ असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येणार आहे. बस-स्टँडवर दररोज येणाऱ्या महिलांना दारुड्यांकडून छेडछाड व त्रास होण्याची भीती. भट्टीलगतच मुलांची तासिका (ट्युशन क्लास) असल्याने विद्यार्थ्यांचे वातावरण बिघडण्याची शक्यता. भट्टीजवळून जाणारा रस्ता हा कॉलनीचा मुख्य रस्ता असून महिलांची सततची ये-जा असल्याने असुरक्षिततेची भावना वाढणार. एटीएम केंद्र भट्टीजवळ असल्याने गैरकृत्ये, वादविवाद, चोरी आदींचा धोका वाढू शकतो.
स्थानिक नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की, या देशी दारू भट्टीची परवानगी तात्काळ रद्द करावी, अन्यथा बहिरमबाबा नगर प्रभाग क्रमांक 3 व घुग्घूस शहरातील नागरिक तीव्र आंदोलन उभारतील, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.
या विरोधात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये काँग्रेस किसान सेल जिलाध्यक्ष रोशन पचारे, युवक काँग्रेस अध्यक्ष तौफीक शेख, व्यापारी संघटनेचे सदस्य मनोज परसवार, सुधाकर जुनारकर, गणेश हिकरे यांचा समावेश असून त्यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांनी शासनाला आवाहन केले आहे की, सभ्य वस्तीत अशा प्रकारच्या दारू भट्ट्या सुरू करण्याचा निर्णय त्वरित मागे घेतला जावा, अन्यथा व्यापक आंदोलन अपरिहार्य ठरेल.



