ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध अनुयायांसाठी विशेष सुविधा द्या

समृद्धी महामार्गावर टोल माफी व बल्लारपूर-मुंबई विशेष रेल्वेची मागणी

चांदा ब्लास्ट

खा. धानोरकर यांची मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) चैत्यभूमी (मुंबई) आणि दीक्षाभूमी (नागपूर) येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून समृद्धी महामार्गावर (मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग) टोलमधून संपूर्ण सवलत देण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी खासगी वाहनांनी प्रवास करतात. त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी व्हावा, तसेच त्यांना वेळेवर आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी बौद्ध अनुयायांची वाहने टोलमुक्त करावीत. महाराष्ट्राकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्याचा हा मोठा सन्मान ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पत्र पाठवून बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरून मुंबईसाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईला जातात. नियमित गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, अनुयायांच्या सोयीसाठी ०५ डिसेंबर रोजी बल्लारपूरहून मुंबईसाठी (अप) आणि ०७ डिसेंबर रोजी मुंबईहून बल्लारपूरसाठी (डाऊन) अशी एक विशेष रेल्वेगाडी त्वरित चालवावी, अशी विनंती रेल्वेमंत्र्यांना करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये