संविधान दिनानिमित्त शिक्षकांची व्याख्यानमाला
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त शिक्षकांची भव्य व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापक विजय डाहूले, समिती प्रमुख प्रा. नंदा भोयर व एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा. आरजू आगलावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या व्याख्यानमालेमध्ये संविधानातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये लोकशाहीचे मूलभूत अधिकार, महिला सक्षमीकरण आणि कायदेशीर संरक्षण, संविधानातील समानता तत्त्व, नागरिकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या अशा विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला.
प्रा. आरजू आगलावे, प्रा. प्रताप शेंडे, प्रा. प्रदीप परसुटकर, प्रा. सुधीर थिपे व प्रा. आशिष देरकर यांनी प्रभावी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, लोकशाहीची ताकद आणि समतेची मूल्ये यांची प्रेरणादायी माहिती दिली.
संविधानातील समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित ही व्याख्यानमाला विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणारी ठरली. महाविद्यालयाने घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवण आणि नागरिकत्वाची जाणीव दृढ करणारा म्हणून विशेष कौतुकास पात्र ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा. नरेंद्र हेपट यांनी केले.



