चांदा पब्लिक स्कूल येथे संविधान दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
चांदा पब्लिक स्कूल येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन उत्साहात, अभिमानात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे संविधान सादर करुन नाविन्या बातुलवार हिने केली. यानंतर मैत्री मेश्राम हिने आर्टीकल-५१ सादर केले. शाळेचे शिक्षक संघपाल भसारकर यांनी संविधान दिनाचे महत्त्व या विषयावर भाषण सादर केले. पूर्व-प्राथमीक शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत या चार भाषेत ‘भारतीय संविधानाची उद्देशीका’ सादर केली. तद्वतच विद्यार्थ्यांनी ‘उद्देशिका’ मधील मुख्य घटकांवर आधारित नाटिका तसेच ‘प्रश्नमंजुषा’ घेण्यात आली.
संविधान दिनाचे औचित्य साधत विद्यार्थी कल्याण आणि जनजागृती वाढविण्यासाठी वर्ग ८, ९, १० वी करिता विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्राकरीता शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे, परीविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर, जिल्हा महिला व बालविकास विभागात कार्यरत राणी खडसे, श्री. अभिषेक मोहूर्ले उपस्थित होते.
श्री. अभिषेक मोहूर्ले यांनी POCSO (Protection of Children from Sexual Offences Act) कायदा यावर माहिती देत मुलांच्या सुरक्षितेसाठी असलेल्या तरतुदी, बाल हेल्पलाइन आणि बाल कल्याण योजना या विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर सांगीतले. अडचणीच्या प्रसंगी मुलांना मदत करण्यासाठी १०९८ हेल्पलाइन उपयुक्त कसे ठरते याबाबत विद्यार्थ्यांना समजावून दिले.
तसेच सौ. राणी खडसे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत बालक-पालक संवाद, बालसंरक्षण, सखी योजना या विषयावर मार्गदर्शन केले. मुलांना येणा-या अडचणी त्यांनी आई-वडील, शिक्षक किंवा विश्वासपात्र व्यक्तींकडे व्यक्त कराव्यात असेही ते म्हणाले.
श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या हक्काचा उपभोग घेत असतांना मूलभूत कर्तव्याचा विसर पडू नये यावर नेहमीच भर दिला.
शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना त्यांची कर्तव्य आणि जबाबदारी याची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनन्या अलोणे, श्रणवी चिकटे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंतरा पारखी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता कार्यक्रम प्रमुख फहीम शेख, रूहीना तबस्सुम यांनी यांनी मोलाचे कार्य केले.



