ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१६ ऑक्टोबर रोजी (अत्यावश्यक सेवा वगळता) सार्वजनिक सुट्टी जाहीर

खा. धानोरकर यांच्या मागणीला यश 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन इतिहास घडवला. या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’ निमित्त दरवर्षी मोठा जनसमूह या दिवशी चंद्रपूरमध्ये एकत्र येतो. मात्र, या दिवशी अद्यापही सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आलेली नव्हती.

या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विभागीय आयुक्तांकडे आक्रमक मागणी करून १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत, जिल्हाधिकारी विनय गौडा (अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर) यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत १४ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृत आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील.अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कार्यालयांनी फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच आवश्यक कर्मचारी उपस्थित ठेवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले होते की, या दिवशी सुट्टी नसल्यामुळे अनेक शासकीय कर्मचारी, कामगार आणि नागरिकांना रजा मिळवून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी, दीक्षाभूमीवरील ऐतिहासिक सोहळ्यात त्यांचा सहभाग मर्यादित राहतो.

मात्र आता जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या सुट्टीमुळे लाखो अनुयायांना व त्यांच्या कुटुंबीयांना या पवित्र दिनाचे उत्साहात व शांततेने पालन करता येणार आहे. ही मागणी अंशतः मान्य झाल्याने समाजाच्या भावना आणि लोकहित दोन्हींचा सन्मान झाला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये