अमराई वॉर्डातील भूस्खलनग्रस्तांचा न्यायासाठी आमरण उपोषणाचा इशारा

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) – वेकोली वणी क्षेत्र, घुग्घुस येथील भ्रष्टाचारामुळे अमराई वॉर्ड क्रमांक ०१ मध्ये झालेल्या भूस्खलनप्रकरणी पीडित नागरिकांनी न्याय मिळावा म्हणून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून प्रमोद महाजन मंच, आठवडी बाजार, नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू होणार आहे.
उपोषणात शिवसैनिक (उबाठा गट) तसेच भूस्खलनग्रस्त कुटुंब सहभागी होणार असून शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात ही लढाई उभारली जाणार आहे.
भूस्खलनग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत –
1. वेकोलीच्या भ्रष्टाचारामुळे प्रभावित अमराई वॉर्ड क्रमांक ०१ मधील १६० कुटुंबांना हक्काची घरे द्यावीत.
2. भूस्खलनात घर गमावलेल्या मडावी परिवाराला योग्य मोबदला देण्यात यावा.
3. भूस्खलनग्रस्तांच्या यादीतून वगळल्या गेलेल्या १६८ कुटुंबांचा समावेश पुन्हा करण्यात यावा.
२६ ऑगस्ट २०२२ रोजी अमराई वॉर्डात सुमारे ७० ते ८० फूट खोल खड्डा पडून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेत गजानन रामचंद्र मडावी यांचे संपूर्ण घर खड्ड्यात समाविष्ट झाले होते. त्यानंतर तीन वर्ष उलटून गेले तरी शासन आणि वेकोली प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
उपोषणात सहभागी होणाऱ्या प्रमुखांमध्ये पूनम वाघमारे, उज्वला मडावी, छाया पासवान, आशा कोटांगळे, सविता पडेवार, बळी श्रीसागर आणि अमित बोरकर यांचा समावेश आहे.
या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
प्रतिलिपी नगरपरिषद घुग्घुस आणि पोलिस स्टेशन घुग्घुस येथे देण्यात आली आहे.