ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती तालुक्यात शेतकऱ्यांचा तहसीलदारांविरोधात रोष 

पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची व सातबारा बंद न करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

 शे.सं. युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांची मागणी 

   चंद्रपुर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांच्यासोबत दिनांक ९ आक्टोंंबर रोजी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तालुका कार्यालयात धडक दिली. जिवती तालुक्यातील सातबारा अभिलेख शासनाने ऑनलाईन केले नाही. शासनाकडे तालुक्यातील दस्त अद्यावत नसताना कागदपत्रांच्या त्रुटी असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे सातबारा रद्द करण्याचे आदेश देण्यास तहसीलदार रुपाली मोगरकर यांनी सुरू केली आहे. ऐन संकटात हे आदेश निघत असल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित होतील. त्यामुळे शेतकऱ्यांत तहसीलदार यांच्याविरोधात रोष तयार झाला आहे. जिल्ह्यात ६ पैकी ५ सत्ताधारी आमदार असताना शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम होताना दिसणे दुर्दैवी असून प्रशासन देखील शेतकऱ्यांसोबत असंवेदनशीलपणे वागत असल्याचा आरोप शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांनी केला. यावेळी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सुदाम राठोड, देविदास वारे, गणेश कदम, उद्धव गोतावळे, सूरज गव्हाणे, सौरभ मादासवार यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

  जीवती तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून बांधावर सरसकट पंचनामे झाले नाही, ही आपबीती तहसीलदार यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडली. यावर तहसीलदार यांनी तालुक्यात शेतकऱ्यांचे ओला दुष्काळाने सरसकट नुकसान झालेच नाही, असे असंवेदनशील वक्तव्य केले. संपुर्ण शेतांचे पंचनामे करण्याआधीच नुकसान न झाल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला.

            दरम्यान पल्लेझरी येथील शेतकरी बालाजी कांबळे यांनी माझ्या शेतात अजून एकही अधिकारी पंचनामे करायला आला नसून माझे खरिपाचे पिक पूर्ण वाया गेले असल्याचे सांगितले. धोंडाअर्जुनी येथील गोविंद पवार यांनी आपल्याकडे शेतीचा जुना पट्टा असताना सातबारा बंद करण्याची कार्यवाही तहसीलदार यांनी सुरू केली आहे. माझ्या शेतात नुकसान झाले असताना अद्याप तलाठी, मंडळ अधिकारी अथवा तहसीलदार मोक्यावर आलेले नाही, असे सांगितले. शेणगाव येथील शब्बीर जहागीरदार यांनी संपूर्ण पंचनामे न झाल्याने जिवती तालुका मदतीपासून वंचित राहिल आणि या अडचणीच्या काळात सातबारा बंद करण्याची कार्यवाही न थांबविणे यातून प्रशासनाची असंवेदनशीलता दिसते असे मत मांडले. मागील तीन पिढ्यांपासून ज्या शेतीवर उपजीविका त्याच शेतीचा सातबारा बंद करून टाकला. आता पिककर्ज कसे काढावे, शासकीय अनुदान कसे मिळवावे असे प्रश्न तयार झाल्याचे नंदप्पा येथील शेतकरी गणेश कदम यांनी मांडले.

          जिवती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची शेतजमीन धोक्यात आली आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना अद्याप पंचनामे न होणे, नुकसान मदतीपासून वंचित ठेवणे आणि सातबारा बंद करणे हे असंवेदनशील प्रकार थांबले पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सुदाम राठोड, देविदास वारे, उद्धव गोतावळे, सूरज गव्हाणे, सौरभ मादासवार यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये