राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त लोकमान्य विद्यालयात विविध उपक्रम
सायकल रॅली व खेळाडूंचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस दि.29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत असतो.या दिनाचे औचित्य साधून लोकमान्य विद्यालय भद्रावती येथे खेळ, आरोग्य जनजागृती शपथ,सायकल रॅली, खेळाडूंचा सन्मान, खेळाचे महत्व, क्रीडा स्पर्धा घेऊन विविध उपक्रम राबविण्यात आले.
क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा,ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व समजावे शहरात क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशातून दिनांक 29 ऑगस्ट 2025 ला लोकमान्य विद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिन आयोजित करण्यात आला.
राष्ट्रीय क्रीडा दिनाची सुरुवात आरोग्य क्रीडा सायकल जनजागृती रॅली ने झाली. त्यानंतर येथील बॉक्सिंग प्रशिक्षिका सौ लता इंदुरकर मॅडम यांचे उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने झाली त्यानंतर प्रास्ताविकातून विशाल गावंडे यांनी क्रीडा दिनाचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगितला.
यानंतर क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू पोहोचवून भद्रावती चे नावलौकिक केल्याबद्दल सौ.लता इंदुरकर मॅडम यांचा शॉल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे असे लता मॅडम यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य प्रफुल वटे सर तसेच प्रमुख अतिथी पर्यवेक्षक आशुतोष सुरावार,ज्येष्ठ शिक्षक देविदास जांभुळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अभिजीत काशीवार व आभार प्रतीक नारळे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.