ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राजक्ता व शुभ्रा ह्या चिमुकल्या झाल्या आई वडीला विना पोरक्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

      ब्रह्मपुरी तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या अऱ्हेर नवरगाव येथील रहिवासी वसंता ठेंगरे. त्यांना एक मुलगा तुषार. तुषार चे गावातीलच वैशाली नामक युवतीशी विवाह झाला. त्यांचा प्रेमाचा संसार चांगला फुलू लागला. त्यांच्या संसाराच्या वेलीला दोन कळ्या उमलल्या. प्राजक्ता आणि शुभ्रा. प्राजक्ता ६ वर्षाची तर शुभ्रा २ वर्षाची. घरी पोट भरेल इतकी शेती. त्यामुळे हातावर आणणे आणि पानावर खाणे ही नित्याची त्यांची परिस्थिती. सर्व काही सुरळीत सुरू असताना, अचानक जून महिन्यात तुषार ठेंगरे यांचा करून मृत्यु झाला. घरातील कर्ता पुरुष व मुलींचं बाप गेल्यानंतर वैशालीने मोठ्या खंबीर पणे उभे राहून स्वाभीमानाने जगण्यासाठी संघर्ष सुरू केला. मिळेल ते काम करणे व घर चालविणे. घरी म्हातारे सासू सासरे, व दोन लहान मुली हेच तिचं सगळं जग होत.

   पती तुषार च्या निधनाच्या दुःखातून सावरत असताना, दोन महिन्यानंतर २० ऑगस्ट २०२५ ला वैशाली अचानक आजारी पडली. घरीच ती अंथरुणाला खिळली. माय वैशाली अंथरुणावर खितपत पडल्याचे पाहून, प्राजक्ता व शुभ्रा ह्या निरागस मुली मायेजवळून हटत नव्हत्या. वैशालीची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे तिला ब्रम्हपुरीतील ख्रिस्तानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु निष्ठूर नियतीच्या मनात काही वेगळेच होते. डॉक्टरांनी बरेच उपचार केले, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. दोन दिवसांच्या आजारपणात वैशालीचा रुग्णालयात करून अंत झाला.

तो बैल पोळ्याचा दिवस होता. शेतकऱ्यांच्या आनंदाचा सण बैल पोळा, गावात सर्वत्र साजरा केला जात असताना, वैशालीच्या जाण्यामुळे ठेंगरे कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला. प्राजक्ता व शुभ्रा ह्या दोन्ही निरागस मुलींना सोडून वैशाली फार दूर जग सोडून गेली. दोन्ही मुलीं माय सोडून गेल्यामुळे ओक्साबोक्शी रडतं होत्या. घराजवळचे सगळे लोक वैशालीच्या अशा अचानक जाण्यामुळे हळहळत होते. प्रत्येकाच्या मुखात त्या दोन मुली पोरक्या झाल्याचे भाव व्यक्त होत होते. आई-वडिलांच्या जाण्यामुळे दोन्ही मुली पोरक्या झाल्या. त्यांचा सांभाळ करण्यासाठी घरात आजी आजोबा आहेत, पण ते सुद्धा म्हातारे.

समाजसेवी संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे

    ब्रह्मपुरी तालुक्यातील स्वयंसेवी संघटना व राजकीय पक्ष, समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्वांनी मदतीचा हात दिल्यास वा शिक्षणाचे पालकत्व स्वीकारल्यास दोन्ही निरागस बालकांना जगण्यासाठी मोठा आधार होणार आहे. या सत्कार्यासाठी ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिकांनी समोर येऊन थेट कुटुंबीय किंवा आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून सहकार्य करावे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये