वेकोली वणी क्षेत्रातील कामगार वसाहतीत स्वच्छतेचे प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट
वेकोली वणी क्षेत्रातील कामगार वसाहत सुभाषनगर आणि गांधी नगर येथे नाली सफाई मोहीम माजी ग्रामपंचायत सदस्य महेश लट्टा यांच्या पुढाकाराने राबवली जात आहे. मात्र, या परिसरातील स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमलेला असतानाही अशी मोहिम हाती घ्यावी लागते, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ठेकेदाराचे काम केवळ कागदोपत्री आणि संघटनांच्या नेत्यांपुरतेच मर्यादित आहे काय, असा संशय निर्माण झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मजुरांच्या हितरक्षणासाठी पाच ट्रेड युनियन – HMS, BMS, आयटक, इंटक आणि सीटू – सक्रिय असल्याचे सांगितले जाते. परंतु त्यांची प्रत्यक्ष कामगिरी मात्र वसाहतीच्या विदारक स्थितीवरून दिसून येत नाही. मोडकळीस आलेली क्वार्टर्स, तुटलेल्या व जाम नाल्या, पिण्याच्या पाण्याची टंचाई – हे प्रश्न नेमके कधी सोडवले जाणार?
जर ठेकेदार वेळेवर आणि नीटनेटके काम करत असता, तर रहिवाशांना या समस्यांचा सामना करावा लागला नसता. मग घुग्घुस नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी या प्रश्नांकडे गंभीरतेने पाहतात की सर्व काही फक्त कागदांवरच अडकले आहे? ठेकेदाराचे बिल मात्र वेळेवर पास होत असते, तर त्यामागे कमिशनखोरीचा वास येत नाही का?
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, मजुरांच्या जीवनाशी निगडित प्रश्न सतत दुर्लक्षित केले जात असताना, संघटना फक्त नावापुरत्याच उरल्या आहेत का? आरोग्य विभागाने या अस्वच्छतेकडे आणि अस्वस्थ वातावरणाकडे लक्ष देणार का, की डोळेझाक करणार?
हा संपूर्ण प्रकार निष्काळजीपणाचा आहे का की संगनमताचा?
कामगार वसाहतींचे प्रश्न कधी सोडवले जाणार?
जबाबदारी कोण घेणार – युनियन, ठेकेदार की प्रशासन?
हे प्रश्न आता थेट कामगारांसमोर उभे ठाकले आहेत आणि उत्तर जबाबदारांना द्यावे लागेल.