चांदा क्लबवर स्टॉल्ससाठी नोंदणी सुरु
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर मिळणार स्टॉल्स

चांदा ब्लास्ट
ग्राहकांना पीओपी मूर्ती असल्याची माहिती देणे बंधनकारक
चंद्रपूर :_
आगामी श्रीगणेशोत्सव काळात चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. येथे दुकाने लावण्यास नोंदणी प्रक्रिया झोन क्रमांक १ वर सुरु झाली असुन प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरच स्टॉल्सचे वाटप करण्यात येणार आहे.
मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा मनपाने उपलब्ध करून देण्यात येत आहे.यासाठी नोंदणी करतांनाच मूर्ती विक्रेत्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येत असुन या क्रमांकाच्या आधारे २१ ऑगस्ट दुपारी ४ वाजता चांदा क्लब येथे स्टॉल्सचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकर नोंदणी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपी मूर्तींबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती सर्वांना होणे आवश्यक असल्याने उपायुक्त संदीप चिद्रवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मूर्तिकार व मूर्तिविक्रेते यांची बैठक मनपा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यात मूर्ती पीओपीची असल्यास विक्री करतांना उत्पादक व विक्रेते यांनी मूर्तीच्या मागील बाजूस, स्पष्टपणे दिसेल अशा स्वरुपाचे ऑईल पॅटने लाल रंगाने गोल आकाराचे चिन्ह ठेवणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे विक्रीची नोंदवही ठेवणे,विसर्जनाबाबतची माहिती देणारी माहितीपत्रिका इत्यादी बाबी बंधनकारक करण्यात आल्या असल्याचे सांगितले.
जरी माननीय न्यायालयाने मातीची मूर्ती बंधनकारक नसेल केली तरी शहरातील नागरिकांच्या मदतीने साजरा केला जाणारा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
मूर्ती विक्रेत्यांची अधिकृत ठिकाणे –
चांदा क्लबशिवाय फक्त सिटी हायस्कूल जवळील जुन्या विक्रेत्यांना चंद्रपूर महानगरपालिकेने मूर्ती विकण्याची परवानगी दिली आहे.मात्र त्याशिवाय इतर फुटपाथ अथवा रस्त्यावर विक्रेत्यांना पूर्णपणे मनाई आहे.
आकर्षक बक्षिसे –
फक्त चांदा क्लब येथील मूर्तिकांरांकडून मूर्ती विकत घेणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असुन यातील ८ भाग्यवान विजेत्यांना घरगुती उपयोगी वस्तु आकर्षक स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत.
चांदा क्लबवर प्रदर्शनीत लाभ घ्या :
एकाच ठिकाणी विविध वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल्स
पूजा साहित्य व सजावट साहित्यांचे स्टॉल्स
खाद्यपदार्थांचे स्टॉल्स
प्रशस्त वाहन पार्कीग व्यवस्था
गर्दीमुक्त मोकळे वातावरण
मा. उच्च न्यायालयाच्या ठळक मार्गदर्शक सूचना –
प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) मूर्तीचे उत्पादक व विक्रेते यांनी मूर्ती विक्री करताना मूर्तीच्या मागील बाजूस, स्पष्टपणे दिसेल अशा स्वरुपाचे ऑईल पॅटने लाल रंगाने गोल आकाराचे चिन्ह करावे.
प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) मूर्ती बनविणारे मूर्तीकार व मूर्ती विक्रेत्यांना सदर मूर्तीची विक्री करताना याबाबतची नोंदवही ठेवणे बंधनकारक राहील.
मूर्तीकार व विक्रेते यांना परवाना प्रदान करताना त्यामध्ये नोंदवही ठेवणे बंधनकारक असल्याची माहिती देण्यात यावी.
मूर्ती विक्रेत्याने प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) मूर्ती समवेत मूर्ती विसर्जनाबाबतची माहिती देणारी माहितीपत्रिका ग्राहकास द्यावी.
५ फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती या कृत्रिम तलावातच विसर्जित कराव्या.