ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षणाने समाज बदल घडवावा – जय भारत चौधरी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र फक्त लक्षात ठेवायचा नाही तर तो जीवनात उतरवायचा आहे. आजच्या काळात बाबासाहेब असते, तर ते यापेक्षा एक पाऊल पुढे जात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन समाजाला दर्जेदार ज्ञान देण्याचा सल्ला दिला असता, असे उद्गार एडिनबर्ग विद्यापीठ, स्कॉटलंड येथे पीएचडी संशोधन करणारे दलित समाज अभ्यासक जय भारत चौधरी यांनी काढले.

ते बुद्धीस्ट समन्वय कृती समिती, चंद्रपूर आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात बोलत होते. ते म्हणाले, “ज्ञान हेच खरे बळ आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात संघर्ष करूनही जे विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेतात, तेच खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रगतीसाठी दीपस्तंभ ठरतात. दलित-बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी तर हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे.” कार्यक्रमात विक्रीकर अधिकारी मिलिंद निमसरकार यांनी स्पर्धा परीक्षांबाबत सखोल मार्गदर्शन करताना, “योग्य दिशेने, योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास कुठलीही मोक्याची जागा विद्यार्थ्यांच्या आवाक्यात येऊ शकते” असे सांगितले. यावेळी बाबा मून यांचा सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागाबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी बुद्धप्रकाश वाघमारे होते. प्रमुख अतिथी, अशोक खोब्रागडे, गीता अंबादे, परमेश्वर मेश्राम, विद्याधर लाडे, रतीराम चव्हाण, अमित अंबादे यांची उपस्थिती होती.

१० ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या या समारंभात दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर अशा ४५ गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने आणि समाजसेवेची जिद्द स्पष्ट दिसत होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव अशोक खोब्रागडे यांनी केले. संचलन संजय झोडे यांनी तर प्रवीण नेल्लुरी यांनी सर्वांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये