मनपा मुख्यालयात आयुक्तांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी संपन्न

चांदा ब्लास्ट
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवार 15 ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले,तसेच मान. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उदघाटन करून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालखी दिंडी काढण्यात आली.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त यांनी सांगितले की,या स्वातंत्र्य दिनी प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प घ्यावा व त्यादृष्टीने आपले योगदान निश्चित करावे.राष्ट्रध्वजाचे महत्व सर्वांच्या मनात अधोरेखित करण्याच्या दृष्टीने देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात आली असुन अभियान अंतर्गत 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान ध्वज वाटप,बाईक रॅली,हुतात्म्यांना अभिवादन,तिरंगा यात्रा,तिरंगा सेल्फी स्पर्धा, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेला,तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वयंसेवक नोंदणी, तिरंगा रांगोळी स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा,तिरंग्यावर आधारित राखी स्पर्धा,स्थानिक कलाकृतींचे भव्य प्रदर्शन पत्रलेखन स्पर्धा,सामुदायिक स्वच्छता मोहीम, जागरूकता उपक्रम इत्यादी विविध उपक्रम मनपातर्फे राबविण्यात आले.
हुतात्मा स्मारक येथे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते तर झोन क्रमांक 1 येथे सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार व झोन क्रमांक 2 व 3 येथे सहायक आयुक्त अनिलकुमार घुले यांच्या हस्ते तसेच मनपाच्या सर्व 26 शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सन 2025 हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (750) जंयती वर्ष आहे. शासन निर्णयानुसार 15 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5 वाजता गांधी चौक येथुन पालखी मिरवणुकीचे आयोजन मनपातर्फे करण्यात आले होते.
मनपातर्फे सायंकाळी 5 वाजता संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. दिंडीत 300 शालेय विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,मुक्ताई,सोपानदेव अश्या विविध पारंपारिक वेशभूषा साकारत गजर केला. विविध भजने गात मिरवणूक मार्गक्रमण करत होती,कीर्तन, निरुपणातून संतांची शिकवण व महाराष्ट्राची भक्ती परंपरा व वारकरी संप्रदायातील यांचे महत्त्व या कार्यक्रमातून सांगण्यात आले.याप्रसंगी लेझीम पथक सुद्धा सोबत होते. सजविलेल्या बैलबंडी पालखीवर महाराजांची प्रतिमा ठेऊन गांधी चौक ते आझाद बगीचा मार्गे परत गांधी चौक असे मार्गक्रमण करत दिंडी संपन्न झाली.
कार्यक्रमास प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त विपीन पालिवाल,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिद्रवार, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे,सहायक आयुक्त अनिलकुमार घुले सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,नगर सचिव नरेंद्र बोबाटे,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, उपअभियंता रवींद्र कळंबे,उपअभियंता प्रगती भुरे,स्वच्छता विभाग प्रमुख डॉ.अमोल शेळके,सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे,अमुल भुते,डॉ.अश्विनी भारत,डॉ.जयश्री वाडे,नरेंद्र पवार,अतुल भसारकर,आशीष भारती,अमित फुलझेले यांच्यासह सर्व कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.