सर्वसामान्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी पतसंस्था प्रभावी माध्यम – अशोक भैय्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, व्यवसायीकांचा आर्थिक स्तर उंचाविला पाहिजे, त्यांना वेळोवेळी आवश्यक कर्जाचा पुरवठा झाला पाहिजे, तसेच छोट्या बचतीची सवय लावून त्यांची उन्नती साधण्यासाठी पतसंस्था नक्कीच फायदेशीर ठरेल. पतसंस्थेच्या माध्यमातून पुण्याई हेच लक्ष गृहित धरून या पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. सर्वसामान्य व्यवसायिक, शेतकरी व वंचितांच्या आर्थिक उत्थान हे उद्दिष्ठ समोर ठेवून श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अशोक भैय्या यांनी उद्घाटन समारंभात व्यक्त केले.
श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा आज दि. ०३ ऑगस्ट रविवारला सकाळी ११ वाजता भैय्या कॉम्प्लेक्स, टॉवर १, वडसा रोड ब्रम्हपुरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ.मिलींद नरोटे आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र, प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. सुभाष बजाज सदस्य, ने़ हि. शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी, योगेश मिसार अध्यक्ष, व्यापारी संघटना, ब्रम्हपुरी, सुभाष अग्रवाल उपाध्यक्ष, व्यापारी संघटना ब्रम्हपुरी, प्रसिद्ध उद्योजक निलेश मोहता, माजी नगरसेवक गौरव भैय्या आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. सुभाष बजाज, सुभाष अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा प्रदान केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मिलींद नरोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वंचित घटकाला प्रवाहात आणण्यासाठी ही पतसंस्था मोलाची भूमिका बजाविणार असून, जनसामान्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणारी असल्याचे म्हटले.
कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक अतिथींचा परिचय प्रा. अभिजीत परकरवार यांनी केला, तर आभार प्रा.डॉ. प्रकाश वट्टी यांनी मानले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित गणमान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.