कोरपना येथे आर्थिक स्वातंत्र्य, संपत्ती व्यवस्थापन आणि गुंतवणूक या विषयावर कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,राजुरा द्वारा संचालित आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, कोरपना येथे आर्थिक स्वातंत्र्य संपत्ती व्यवस्थापन आणि गुंतवणूक या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन अर्थशास्त्र आणि करिअर कट्टा विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
याप्रसंगी पुणे येथील सुप्रसिद्ध वित्तीय व्यवस्थापन आणि गुंतवणूक तज्ञ मार्गदर्शक चंद्रकांत तुरारे यांनी या कार्यशाळेद्वारे सखोल आणि तांत्रिक असे संपत्तीचे स्वातंत्र्य कसे मिळवायचे, स्वतःच्या संपत्तीचे व्यवस्थापन आणि गुंतवणूक कशी करायची. त्यासाठी स्मार्ट गुंतवणुकीच्या विविध संकल्पना आणि शेअर मार्केट, म्युच्युअल फंड याच्यातील गुंतवणुकीचे महत्त्व स्वरूप आणि त्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाविषयीचे ज्ञान आणि त्याचे महत्त्व या विषयक सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.डी.एम. सुखदेवे, प्रा. मेश्राम, प्रा. डॉ. सुदर्शन दिवसे, प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, जयंत जेनेकर, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राध्यापक रमेश येलपुलवार,स्कॉलर सर्च अकादमीचे प्राचार्य राहुल उलमाले, स्वर्गीय संगीता चटप आश्रम शाळा येथील शिक्षक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यशाळेचा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, विद्यार्थी,नगरवसिय यांनी उपस्थिती दर्शवून लाभ घेतला. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विशाल मालेकर यांनी कार्यशाळेचे प्रयोजन प्रास्ताविकातून स्पष्ट केले . इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र देवाळकर यांनी प्रमुख मार्गदर्शकांचे आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.