भोजवार्ड येथे घरफोडी, भद्रावती पोलिसात तक्रार दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून शहरातील नागरिकात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. अशातच शहरात आणखी एक घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. घर कुलूप बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरात प्रवेश केला, मात्र घरमालकाने आधीच प्रसंगावधान राखून घरातील मौल्यवान वस्तू इतरत्र सुरक्षित ठेवल्याने चोरट्यांच्या हातात काहीच लागले नाही. सदर घटना शहरातील भोजवार्ड येथे उघडकीस आली.
सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेच्या सहाय्याने अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे. भोजवार्ड येथील सय्यद शौकत अली हे आपल्या कुटुंबासह नागपूर येथील ताजुद्दीन बाबा उर्स मध्ये सहभागी होण्यासाठी नागपूरला आपल्या मुलाकडे गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील कपाटांमधील सर्व साहित्य चोरी करण्याचे उद्देशाने अस्तव्यस्त केले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
घरफोडीचा हा प्रकार शेजाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर घर मालकास फोन करून याबद्दलची माहिती दिली व परत बोलावले. भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने ते अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.