घुग्घुसमध्ये उडान पुलाच्या अर्धवट कामामुळे गंभीर समस्या
महिला पेशंटची प्रकृती बिघडली, नागरिकांचा संताप

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) : राजीव रतन चौक येथील उडान पुलाचे सुरू असलेले काम आणि त्यातील दिरंगाईमुळे घुग्घुसमधील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे गेटवर अपुऱ्या सुविधांमुळे वाहतूक ठप्प होत असून, याचा परिणाम थेट रुग्णांवर आणि सामान्य नागरिकांवर होत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, एका गर्भवती महिलेला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात नेत असताना गेटवरील खोळंब्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने तिची प्रकृती गंभीर झाली. याआधीही अशाच प्रकारच्या खोळंब्यामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला होता.
या गंभीर परिस्थितीविरोधात घुग्घुसचे जागृत नागरिक विजय माथनकर यांनी जाहीर निवेदन जारी करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराकडून काम सुरळीत सुरू नसल्याचे समोर आले आहे. क्रेनची अनुपलब्धता आणि नियोजनशून्य कारभारामुळे पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही, ज्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विजय माथनकर यांनी याआधीही आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना पत्राद्वारे नगरपरिषदेच्या स्थापनेसाठी मागणी केली होती. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आदी सर्व पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन घुग्घुसमध्ये नगरपरिषद स्थापनेचा आग्रह धरत आहेत, जेणेकरून गावाचा सर्वांगीण विकास होईल आणि मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील.
या पार्श्वभूमीवर विजय माथनकर यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, रेल्वे गेटवरील समस्येची सखोल चौकशी करून जबाबदारांवर तात्काळ कारवाई करावी. तसेच उडान पुलाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना वाहतूक खोळंबा आणि जीवितधोका यांपासून मुक्त करावे.