ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस : सरकारी मान्यताप्राप्त शाळेची दयनिय अवस्था, महिला काँग्रेसच्या यास्मिन सैय्यद यांनी केली पाहणी

तात्काळ सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर – औद्योगिक नगरी घुग्घुस येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील सर्वात जुनी आणि सरकार मान्यता प्राप्त शाळा सध्या अत्यंत दयनीय स्थितीत असून विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा देखील मिळत नाहीत. या प्रकाराची गंभीर दखल महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा यास्मिन सैय्यद यांनी घेतली असून, तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी यास्मिन सैय्यद यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार सैय्यद यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शाळेची पाहणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. शाळेची इमारत मोडकळीस आली असून, भिंतींना भेगा पडल्या आहेत, छतावरून पावसाचे पाणी वर्गात गळत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत विद्यार्थ्यांना भिजत शिकावे लागत असल्याचे दृश्य पाहून पालक संतप्त झाले आहेत.

तसेच, शाळेतील सर्व पंखे बंद किंवा तुटलेले असून, उष्ण हवामानात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खिडक्या तुटलेल्या असून इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. शाळेत मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहाचीही अत्यंत दयनीय अवस्था आहे. विशेषतः मुलींच्या मूत्रीघराची अवस्था इतकी भयंकर आहे की त्याचा वापर केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

या सर्व परिस्थितीवर सैय्यद यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “शासनाकडून लाखो रुपये वेतन घेणारे शिक्षक स्वतःच्या मुलांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये पाठवतात, पण गरिबांची मुलं जर्जर झालेल्या सरकारी शाळांमध्ये शिकतात. शिक्षण अधिकाऱ्यांचे डोळे झोपेत आहेत की चिरीमिरी घेत गप्प बसले आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सैय्यद यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जर लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती आणि मुलभूत सुविधांची पूर्तता करण्यात आली नाही, तर विद्यार्थ्यांच्या पालकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल.

स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागाने तात्काळ लक्ष घालून शाळेची स्थिती सुधारण्याची गरज व्यक्त केली जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पद्धतीने सुरू राहील.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये