सावली ते चारगाव मार्ग बंद – नदीवरील पूलाच्या अपूर्ण कामाचा फटका
टेकाडी चिमढा वळणमार्गे करावा लागतोय प्रवास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली – सावली ते चारगाव मार्गावरील नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरु असल्याने जुने पूल तोडण्यात आले व बाजूला पर्यायी रपटा बनविण्यात आला मात्र नदीत पाणी वाढल्यामुळे हा रपटा वाहून गेला त्यामुळे मार्ग बंद करण्यात आला आहे.
चारगाव नदीवर ७ कोटी रुपयाच्या किंमतीचे पूल मागील वर्षीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरु आहे. उन्हाळ्यात नवीन पुलाचे बांधकाम करतांना जुने पूल क्षतिग्रस्त करण्यात आले. तात्पुरता बाजूला रपटा बनविण्यात आला व तेथून रहदारी सुरु होती. काम पूर्ण होणार नसल्याने तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचेकडून चिमढा – टेकाडी मार्गाने वाहतुक सुरु ठेवण्यास परवानगी काढण्यात आली आहे.
नदीत पाणी जास्त आल्याने रपटा पाण्याखाली गेला असून मार्ग बंद झालेला आहे. या मार्गाने चारगाव, भारपायली, मानकापूर, चक मानकापूर, मेटेगाव, सादागड, सादागड हेटी या गावातून प्रवास करणाऱ्यांनी चिमढा, टेकाडी व पांढरसराड या मार्गाने प्रवास करावा व भारपायली बंधाऱ्यावरून पायी प्रवास करावा असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.
विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान
सावली येथील माध्यमिक शाळेत व महाविद्यालयात या भागातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र हा मार्ग बंद असल्याने व वेळेवर बसची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
संथगतीने होणाऱ्या बांधकामाचा जनतेला फटका..
मार्च २०२४ पासून पुलाचे बांधकामाला एस. डी. मुलानी कन्स्ट्रॅक्शन कपंनीने सुरवात केली. मागील पावसाळ्यात जुने पूल कायम असल्याने वाहतुकीस अडचण गेली नाही मात्र उन्हाळ्यात जुने पूल तोडण्यात आले परंतु बांधकाम संतगतीने सुरु असल्याने काम अपूर्ण राहिले. त्यामुळे त्या भागातील जनतेला वाहतुकीचा फटका बसत आहे.
पुढेही अशी अडचण होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुदतीत काम संबंधित कंत्राटदारकडून करून घ्यावे अशी मागणी होत आहे.