देवाडा खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे
जीर्ण इमारत, डॉक्टरांचा अभाव, रुग्णांचे हाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा तालुक्यातील सर्वात मोठ्या देवाडा खुर्द गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था उघड; ग्रामस्थांकडून तातडीने नवीन इमारत व कायमस्वरूपी डॉक्टरांची मागणी
देवाडा खुर्द, प्रतिनिधी : पोंभुर्णा तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असलेल्या देवाडा खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात आरोग्य केंद्राची जीर्ण अवस्था आणि डॉक्टरांचा कायमस्वरूपी अभाव हा गंभीर प्रश्न बनला आहे.
आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या छताला मोठे तडे गेले असून अनेक ठिकाणी सिमेंट निखळले आहे. पावसाळ्यात छत गळत असल्याने संपूर्ण इमारतीत ओलसरपणा निर्माण होतो. परिसरात अस्वच्छता असल्याने रुग्णांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्यसेवा कशी मिळणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या केंद्रात नियमित डॉक्टर उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि आपत्कालीन रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गावात आरोग्य केंद्र असूनही उपचारासाठी रुग्णांना पोंभुर्णा, उमरी किंवा इतर ठिकाणी जावे लागत असल्याने वेळ आणि पैशांचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो. अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्यसेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व आरोग्य विभागाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन देवाडा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करावी, तसेच नवीन इमारतीचे बांधकाम किंवा आवश्यक दुरुस्ती करून सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी तीव्र मागणी गावकरी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
– सामाजिक कार्यकर्ता : मनीष राऊत



