आरोग्य हीच खरी संपत्ती _ गोविंद भाऊराव पेदेवाड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
‘आरोग्य म्हणजे संपत्ती’ हे केवळ शब्द नसून जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे. कारण जोपर्यंत आपण शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या निरोगी असत नाही, तोपर्यंत आपण आपल्या जीवनाचा आनंदच घेऊ शकत नाही. आजच्या या काळात प्रत्येकाला उत्तम आरोग्याची नितांत गरज आहे. ज्या व्यक्तीचे शरीर आणि मन निरोगी असते, त्याच्याकडेच जगातील खरी संपत्ती असते. जर तुमच्याकडे भरपूर पैसा व भरपूर वेळ असेल, परंतु ही संपत्ती आणि वेळ खर्च करण्यासाठी निरोगी शरीरच नसेल तर ते कसे होईल? या धावपळीच्या जगात आपण सर्व आपापल्या कामामध्ये इतके व्यस्त झालो आहोत की, आपल्याला आयुष्याचा पुरेपूर आनंद घेताच येत नाही.कारण माणूस आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे तो त्याच्या आहार विहारावर लक्ष देत नाही.आजकालच्या जीवनशैलीत बरेच लोक फास्ट फूडचे सेवन करतात.त्यामुळे लठ्ठपणा, हृदयरोग,उच्च रक्तदाब यासारखे आजार होतात.तुमचे आरोग्य चांगले असेल तर तुम्ही मानसिक व शारीरिक दृष्ट्या वास्तविक जीवनाचा आनंद घेऊ शकता.
उत्तम आरोग्य म्हणजे सुखी, स्वास्थ्य जीवनाचा सकारात्मक पैलू. शरीराचे सर्वच अवयव अगदी सामान्यपणे काम करतात, दैनंदिन हालचाली सहजपणे होतात अशी शारीरिक व मानसिक अवस्था म्हणजे आरोग्य होय. कोणत्याही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य अतिशय महत्त्वाचे आहे.त्यामुळेच आपण सध्याच्या काळात आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे.आपल्या शरीराचे आपण रक्षण केले पाहिजे.आपल्या खाण्या पिण्याच्या सवयींकडे लक्ष दिले पाहिजे. नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे.दुसरे महत्त्वाचे म्हणजे आपण दररोज व्यायाम सुध्दा केला पाहिजे.हे तुमच्या शरीराला शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत करेल.त्याच बरोबर मानसिक आरोग्यासाठी आपण सकारात्मक राहून ध्यानधारणा ,योगा करणे आवश्यक आहे .कारण ज्या व्यक्तीचे शरीर आणि मन निरोगी असते तो सर्वात सुखी माणूस होय.
लोकं पैशा शिवाय जगू शकतात परंतु स्थिर आरोग्या शिवाय ते त्यांचे जीवन योग्यरीत्या जगू शकत नाहीत.चांगल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासह स्थिर जीवन जगण्यासाठी तुम्हाला अतिशय शिस्तबद्ध जीवन जगावे लागेल.मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींवर नियंत्रण ठेवल्याने व्यक्तीला या गोष्टी सुधारण्यास आणि निरोगी जीवन जगण्यास मदत होते.निरोगी जीवन शैली जीवनात तुम्हाला अधिक चांगले करण्यास प्रवृत्त करेल आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करेल.तुम्ही जर निरोगी असाल तर जगातील सर्व संपत्ती पेक्षा तुम्हाला तुमचे आयुष्य जास्त मोलाचे वाटेल.
थोडक्यात,निरोगी जीवन हे सर्वोच्च दागिना आहे.म्हणून त्याला जपले पाहिजे.तो खऱ्या अर्थाने सर्व सुखाचा स्त्रोत आहे.पैशाने आपण जगातील सर्व सुखसोयी विकत घेऊ शकतो पण ते तुम्हाला चांगले आरोग्य विकत घेऊन देऊ शकत नाही.त्यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.