जागृत ग्राहक राजा चे हे कार्य कौतुकास्पद – प्र. प्राचार्य अजय बोकारे.
ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी लढा देणे गरजेचे - दीपक देशपांडे

जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना शाखा मुल च्या वतीने येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एका महिला व ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ह्यावेळी मंचावरून उद्बोधन करताना आजचा दिवस हा जागतिक महिला दिन आणि जागतिक ग्राहक दिन यांच्या आधी आला असल्याने उपस्थित महिला ग्राहक आणि तमाम ग्राहकांना दोन्ही दिवसांच्या शुभेच्छा देत, दोन्ही दिवसांचे महत्त्व समजावून सांगत आपल्या वक्तव्याचा श्रीगणेशा करताना दीपक देशपांडे ह्यांनी समाजातील समान हक्क आणि समान अधिकार यांच्याबाबत माहितीच्या अभावामुळे फसवणूक सगळ्यांचीच होत असल्याचे सांगितले. ग्राहक कायदा अस्तित्वात आला त्याला ३८-३९ वर्षे लोटत आहेत परंतू आपण अजूनही आपल्या अधिकारांप्रती जागृत नाही, परिणामी संघटीत व्यापारी प्रथा आणि आपल्या अज्ञानामुळे आपण आपली फसवणूक करुन घेत आहोत, काही छोट्या छोट्या गोष्टिंपासून आपण कशाप्रकारे सावधगिरी बाळगली पाहिजे ह्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
महिला दिन आणि ग्राहक दिनानिमित्त बोलताना हे दोन्ही दिवस संघर्ष आणि हक्कासाठी उभारलेल्या चळवळीतील महत्वाचे दिवस असल्याने व आज खरेदीचे प्रकार बदलले तसे फसवणूकीचे प्रकार बदलले परंतू बरेच प्रकार हे केवळ आपल्या अधिकार आणि हक्क यांच्या अपुऱ्या माहितीमुळे घडत असतात आणि यांत सुशिक्षित माणसाची, महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते, यासाठी, उत्पादनात वाढ, वितरणात समानता आणि उपभोगावर संयम या त्रीसुत्रीचा वापर करीत ग्राहक कायद्याने बहाल केलेले सहा महत्वाचे अधिकारांची माहिती करून घेत पावतीचा हट्ट धरलात तर फसवणूक सहजपणे टाळता येऊ शकते. याशिवाय मोफतच्या आणि आकर्षक करणाऱ्या जाहिराती वा प्रलोभनांना दूर ठेवले तर आपण आपली फसवणूक सहज टाळू शकतो असेही पटवून दिले.
कार्यक्रमात संस्थेचे प्र. प्राचार्य अजय बोकारे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न या कार्यक्रमात जागृत ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून तर सचिव रमेश डांगरे,संघटक तुळशीराम बांगरे, डॉ आनंदराव कुळे, मुक्तेश्वर खोब्रागडे,हे अतिथी म्हणून उपस्थित होते .
आज सर्वत्र ग्राहक जागृतीबाबत जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या माध्यमातून एवढा प्रचार प्रसार केला जात असतांनाही माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाची ही कशी आँनलाईन व्यवहारात फसवणूक झाली याचे उदाहरण देत आँनलाईन व्यवहार करताना ग्राहकांना किती सावध राहण्याची आवश्यकता आहे हे पटवून दिले , आणि म्हणूनच जागृत ग्राहक राजा चे हे कार्य कौतुकास्पद आणि अत्यावश्यक बाब म्हणून त्याकडे बघणे , पटवून, समजून घेणे आवश्यक असल्याचे मत अजय बोकारे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात कांचन मॅडम यांचे ग्राहक गीत गायनाने झाली, अतिथींचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविक संघटनेचे सचिव रमेश डांगरे यांनी केले, त्यात कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश, ग्राहक संरक्षण अधिनियम व ग्राहक संघटनेची कार्यप्रणाली व बदललेल्या खरेदी विक्रीचे व्यवहार व फसवणुकीच्या प्रकाराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डी. एस. भदे यांनी केले.
कार्यक्रमाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संपूर्ण अध्यापक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थीनी आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते , आणि चर्चेत सहभागी होऊन समाजातील अशी फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक साध्यासुध्या गोष्टींची आम्ही काळजी घेत नाही, आणि मग फसवणूक झाली की त्याबाबत ओरडत असतो ही बाब सत्य असल्याचे व यानंतर कोणतीही वस्तू खरेदी करताना उत्पादन दिनांक, मुदतबाह्य वस्तू तर नाही ना, व अधिकतम विक्री मुल्य तपासणी करुनच व पावती घेऊनच वस्तू खरेदी करु असे आश्वासन दिले व संघटनेच्या कार्याला सुयश चिंतताना शुभेच्छाही दिल्या व आपल्या कार्यात सहभागी होण्याचे आश्वासनही दिले.