बस स्थानकावर बसची विद्यार्थिनीला धडक – गंभीर जखमी विद्यार्थिनीला चंद्रपूरला हलविले
'प्रवाशांच्या सेवेसाठी' की 'प्रवाशांच्या दुर्दशेसाठी'? प्रवाशांचा सवाल

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
राजुरा येथे जून बस स्थानक तोडून नविन बस स्थानकाचे बांधकाम सुरू असुन ह्या दरम्यान बस सेवा सुरळीत ठेवणे हे महामंडळाचे प्रथम कर्तव्य असुन ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या महामंडळाच्या राजुरा बस स्थानकावर मात्र ‘प्रवाशांच्या दुर्दशेसाठी’ असे नवे ब्रीदवाक्य राजुरा बस स्थानकावर लिहिण्याची वेळ आली असल्याचे दिसुन येते. बस स्थानकाची जुनी इमारत जमीनदोस्त करून तिथे नवे बांधकाम सुरू केले आहे. वास्तविक बघता ह्या बस स्थानकाच्या परिसरात वापरण्यात येत असलेल्या जागेपेक्षा जास्त जागा रिकामी पडून आहे. नवे बांधकाम करताना ह्या जागेवर तात्पुरता बस थांबा निर्माण करण्याची आवश्यकता असतानाही त्या ठिकाणी कंत्राटदाराचे पैसे वाचविण्याच्या उद्देशाने मातीचे ढिगारे जमा करण्यात आले असुन बस थांबण्यासाठी अत्यंत कमी जागा उपलब्ध आहे.
बस स्थानकावर अपुरी जागा असल्याने तिथे अपघाताची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत असतानाच महिला दिनाच्या दोन दिवस आधीच दिनांक 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास शाळेतून पांचाल गावी जाण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषद माजी शासकीय हायस्कुलची विद्यार्थिनी नव्या संतोष वांढरे ह्या विद्यार्थिनीला बस ने संरक्षक भिंतीच्या बाजूने धडक दिली.
ह्या अपघातात विद्यार्थिनी जबर जखमी झाली असुन तीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. त्या विद्यार्थिनीला तत्काळ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करून तिचे सी. टी. स्कॅन करण्यात आले मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. सुदैवाने ह्या धडकेत तिच्या केवळ दुखापत झाली मात्र ज्याठिकाणी भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या अपघाताला एस टी महामंडळ प्रशासन तसेच संबंधित कंत्राटदार जबाबदार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे असुन पोलिसांनी कंत्राटदार तसेच प्रशासनावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.