मातोश्री वृध्दाश्रम, देबू सावली वृध्दाश्रम चंद्रपूर येथे योग दिन उत्साहात साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरटकर
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मातोश्री वृद्धाश्रम, देबू सावली वृध्दाश्रम चंद्रपूर येथील ज्येष्ठ नागरिकांसोबत माया केअर या संस्थेने योग दिवस साजरा केला.माया केअर फाऊंडेशन गेल्या 14 वर्षापासून वृद्धांसाठी मोफत कार्य करीत आहे.
या कार्यक्रमांमध्ये दहा ते पंधरा ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. स्वयंसेवक आदित्य गेडाम यांनी योगाचे वेगवेगळे प्रात्यक्षिक करून दाखवले. या योगा प्रशिक्षणाचा ज्येष्ठ नागरिकांना होणारा लाभ याबद्दल बोलून त्यापासून होणारे फायदे आणि महत्त्व सांगितले. योगा दिनाच्या दिवशी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. वृद्धांच्या आयुष्य वाढीसाठी किंवा थकत्या वयासोबत योगा हा खूप फायदेशीर ठरतो या दृष्टीकोनातून आमच्या स्वयंसेवकांनी समजावून सांगितले. अशा प्रकारे हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे समन्वयक व चंद्रपूर जिल्ह्याचे समन्वयक श्री रामदास कामडी यांनी केले.
माया केअर घरामध्ये एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना गोळ्या – औषधे आणून देणे, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, बँकेची कार्य तसेच त्यांची भावनिक- बौद्धिक ने-आण करणे अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी विनामूल्य सुविधा देते ज्यामुळे ते आनंदी आणि आत्मनिर्भर जीवन जगू शकतात.
अशाप्रकारे अनेक प्रकारची मदत विश्वासू स्वयंसेवक च्या सहाय्याने मोफत करीत आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे मागिल पूर्णपणे कामकाज दिव्यांग (अपंग) असलेले लोक आपल्या घरी बसून करीत आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना, कोणाला मदत हवी असल्यास 1800 572 1343 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे माया केअर च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.