निराधार विधवांसाठी धावून आली आधारवेल
आधारवेलचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
निराधार विधवांना समाजात समानतेचे स्थान मिळावे, त्यांच्या आयुष्यात आनंद फुलावा, आणि त्यांना सन्मानाची वागणूक दिली जावी या उदात्त उद्देशाने गडचांदूर येथील आधारवेल बहुउद्देशीय संस्थेने विधवा महिलांसाठी गडचांदूर येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात (२६ ला.) रविवारी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन पार पाडले.
कार्यक्रमात विविध भागातील विधवा महिलांनी सहभाग घेतला. महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वासाची झलक दिसत होती. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या संघर्षाला मान्यता देत त्यांना समाजाचा अविभाज्य भाग म्हणून गौरवण्यात आले.
समाजात सुहासिनींपेक्षा विधवा महिलांना उपेक्षित वागणूक दिली जाते. या विचारातून बाहेर निघून विधवा महिलांना सुद्धा सुहासिनीसारखीच वागणूक देण्यात यावी अशा सामाजिक परिवर्तनासाठी आधारवेल बहुउद्देशीय संस्थेने उचललेले पाऊल अतिशय स्तुत्य आहे. अनेक विधवा महिलांनी आपला अनुभव यावेळी व्यक्त केला. महिलांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त प्राचार्या स्मिता चिताडे उपस्थित होत्या. उद्घाटन प्रा. आशिष देरकर यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख अतिथी म्हणून चेनव्हींग स्कॉलर ॲड. दीपक चटप, नगराध्यक्ष सविता टेकाम, आधारवेलच्या अध्यक्ष उषाताई टोंगे, उपाध्यक्ष वंदना कातकडे, सचिव कल्पना गोवारदिपे व इतर मान्यवर उपस्थित होते.
समाजातील विधवा महिलांसाठी असलेल्या रूढी व परंपरांविरोधात जनजागृती करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांना प्रेरणादायी संदेश देत त्यांना नवीन आयुष्याची दिशा दाखवण्याचे आवाहन केले. आधारवेल संस्थेच्या या उपक्रमामुळे विधवा महिलांच्या सन्मानासाठी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश पोहोचला. कार्यक्रमाचे संचालन आधारवेलच्या उपाध्यक्ष नलिनी खेकडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सदस्या कल्पना निमजे, वंदना धांडे, अर्चना देवलवार, नंदा वांढरे, नंदा कोंगरे, अनिता बामणकर, अनिता पहानपटे, प्रभा वसाडे, अर्चना काळे, विजया कुचनकर आदींनी सहकार्य केले.