कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अठ्ठाविस हजारावर ई-केवायसी व तेहतीस हजारावर बँक खाते आधार संलग्नित करणे प्रलंबित

शेतकऱ्यांनो ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करा ; २१ जून रोजी प्रत्येक गावपातळीवर विशेष कॅम्पचे आयोजन

चांदा ब्लास्ट

देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ पासून सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिरीक्त लाभ म्हणून ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ ही योजना सुरू करण्यात आली आहे.
पी.एम. किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र शासनातर्फे वर्षाला अतिरीक्त सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यामूळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनातर्फे वार्षिक सहा हजार व राज्य शासनातर्फे वार्षिक सहा हजार असे एकूण १२ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाणार आहे. दर चार महिन्यांच्या अंतराने केंद्र शासनातर्फे दोन हजार रुपये व राज्य शासनाकडून दोन हजार असे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व बँक खात्याला आधार जोडणी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. सदर प्रक्रिया पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पी.एम. किसान सन्मान निधी चा १४ वा हप्ता व पुढील हप्ते तसेच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामूळे ज्या शेतकऱ्यांना आजतागायत १३ हप्ते प्राप्त झालेले आहे, परंतू ई-केवायसीची प्रक्रीया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्यांना सदर दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही.
जिल्ह्यात सध्या एकंदरीत २८०७७ शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे तसेच ३३४४० बँक खाते आधार संलग्नित करणे प्रलंबित आहे. सर्व शेतकऱ्यांचे ई-केवायसी तसेच बँक खात्याशी आधार संलग्नित करणे (DBT Enable) बाबतची कार्यवाही करण्यासाठी २१ जुन २०२३ रोजी कृषी विभागाचे वतीने प्रत्येक गावपातळीवर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी व ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकासोबत संलग्नित नाही त्यांचे बँक खाते आधार संलग्नित करणे किंवा त्यांची नावे इंडीया पेमेंटस् पोस्ट बँक मध्ये नवीन खाते उघडून त्यास आधार संलग्नित करणे विषयक कामे केली जात आहेत.
ई-केवायसी तथा बँक खात्याशी आधार संलग्नित करणे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालय किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर यादीत स्वतःच्या नावाची पडताळणी करून सर्व प्रलंबित शेतकऱ्यांनी ई-केवायसी व बँक खात्याशी आधार संलग्नित करण्याकरीता २१ जून २०२३ रोजी आयोजित विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये