ताज्या घडामोडी

चिमुरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजुर – घोषणेला ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचा तीव्र विरोध

शासन निर्णयाची केली होळी - ब्रम्हपुरी येथेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सोईचे व्हावे ह्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पुन्हा एकदा विभाजन व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रसिद्ध असलेले चिमुर तसेच मोठी बाजारपेठ व शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असलेले ब्रम्हपुरी हे दोन्ही तालुके चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासुन दुर अंतरावर असल्याने दोन्ही तालुक्यातील नागरिक आपल्या तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ह्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. अशातच राज्य शासनाने चिमुर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केल्याची माहिती मिळताच ब्रम्हपुरी वासियांच्या आशा आकांक्षा धुळीला मिळाल्याचे चित्र निर्माण झाल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.

14 जुन रोजी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने चिमुर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या शासकीय आदेशाची ब्रम्हपुरीच्या  उपविभागीय अधिकारी कार्यालयात होळी करून शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला. संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व उपमुखयमंत्री यांना निवेदन देऊन ब्रम्हपुरी येथेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याची मागणी करण्यात आली व आपल्या तीव्र भावना कळविण्यात आल्या. शासनाने ब्रम्हपुरी येथे अप्पर जिल्हाधकारी कार्यालय सुरू न केल्यास 3 जुलै रोजी ब्रम्हपुरी बंद व विशाल धरणे आंदोलन करण्याचा इशारा ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीने दिला आहे.

वृतपत्रांत व विविध चॅनल (मीडिया) च्या बातम्यांमध्ये  चिमुर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मंत्रीमंडळानी मान्यता देऊन  सिंदेवाही, नागभिड व ब्रम्हपुरी तालुका त्या कार्यालयाला संलग्न केल्याचे कळताच 14 जुन रोजी सकाळीच विश्रामगृहात प्रा. सुभाष बजाज यांच्या अध्यक्षतेखाली ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती ची तातडीची सभा घेण्यात आली. ह्या बैठकीत ठरल्यानुसार सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शासन निर्णयाची होळी करून सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय ब्रम्हपुरीलाच देण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास 2019 मध्ये मंजुरी देण्यात आली होती.परंतु दि 3 फेब्रुवारी 2021 ला जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी 15 दिवसाच्या आत आक्षेप अर्ज मागविले होते तेव्हा ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही येथील नागरिकांनी आक्षेप नोंदवत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत हजारो हरकती सादर केल्या होत्या. प्राप्त झालेल्या सर्व हरकतीचा विचार करून जिल्हाधिकारी यांनी चिमूर येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय 28 ऑगस्ट 2021रोजी आदेश काढून ब्रम्हपुरी येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्द करण्याच्या विरोधात चिमूर येथील काही नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून न्यायालयात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते.

परंतु राज्य सरकारने या बाबतीत आपले उत्तर न्यायालयात सादर न करता व कोर्टात केस प्रलंबित असताना सुद्धा दिनांक 13 जून 2023 रोजी मंत्रिमडळ बैठकीत चुकीच्या पद्धतीने निर्णय घेऊन चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय रद्द करून 1910 पासून अस्तित्वात असलेल्या 110 वर्ष जुन्या व सर्व सोईसुविधा उपलब्ध असलेल्या ब्रम्हपुरी येथेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार न केल्यास येत्या 3 जुलै रोजी ब्रम्हपुरी कडकडीत बंद व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विशाल धरणे आंदोलन करण्याचा व नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा इशारा ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे निमंत्रक विनोद झोडगे, सूरज शेंडे, अविनाश राऊत, प्रा.सुभाष बजाज, राजू भागवत, हरीचंद्र चोले, सुधाकर पोपटे, दीपक नवघडे, दत्तू टिकले, तुळशीदास गेडे, महेंद्र बाविस्कर, सुखदेव प्रधान, सुधीर सेलोकर, यादव रावेकर, कमर अल्ली सयद, रईस खान पठाण, सुबोध शेंडे, प्रणय कोहपरे, अमित कनाके, साकेत भाणारकर, तनय देशकर, नरू नरड यांनी केले आहे .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये