रामबागेत भरली स्वयंसेवकांची मांदियाळी – संघाच्या शताब्दी वर्षारंभी श्री विजयादशमी उत्सव साजरा
राजुरा नगरीत पथसंचलन संपन्न

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
जगातील सर्वात मोठे स्वयंसेवी तसेच देशभक्तांच्या संगठन म्हणून नोंद असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षरंभी राजुरा नगराचा श्री विजयादशमी उत्सव शहरातील रामनगर कॉलनी येथिल रामबाग पटांगणावर 20 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून “आदिवासी सेवक” सन्मान प्राप्त वाघुजी गेडाम व प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सदभावना बैठक प्रमुख नितिनजी हिरुरकर तसेच रा. स्व. संघाचे तालुका संघचालक राजेंद्रजी येणुगवार, राजुरा नगर कार्यवाह राकेश अल्लुरवार उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी उत्सव स्थानावरून जवाहर नगर मार्गे, पंचायत समिती मार्गाने कार्यक्रम स्थळापर्यंत स्वयंसेवकांचे पथसंचलन करून नगरातील नागरिकांना शिस्तबद्धतेचे उदाहरण दाखवून दिले त्याचप्रमाणे योग व्यायाम व दंड प्रात्यक्षिकाचे उपस्थितांचे समोर प्रदर्शन करण्यात आले. स्वागत प्रणाम तसेच शस्त्रपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
ह्यावेळी बोलताना मुख्य अतिथी वाघुजी गेडाम ह्यांनी त्यांचा आयुष्यातले संघ स्वयंसेवक व संघाच्या सेवा कार्याचे अनुभव कथन करताना समाजाला आजच्या परिस्थितीत असलेली संघाची गरज आणि संघकार्य विषद करताना संघाबद्दल जाणूनबुजून पसरविण्यात येत असलेल्या भ्रामक अपप्रचारपासून दूर राहून देशभक्त नागरिकांनी या कार्यात स्वतः सहभागी होण्याचे व समजाला संघ अनुभवण्याचे तसेच संघकार्य पर्यायाने देशकार्य करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
मुख्य वक्ते नितिनजी हिरुरकर ह्यांनी श्री विजयादशमीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत असणारे महत्व विशद करताना 1925 साली विजयादशमीच्या दिवशी पूजनीय सरसंघचालक डॉक्टर हेडगेवारांनी संघस्थापनेच्या वेळी ज्या विचारांनी प्रेरित होऊन संघाची स्थापना केली त्या विचाराचे संगोपन करण्यासाठी अखंड प्रयत्नरत राहण्याची गरज प्रतिपादन केली, हिंदुधर्म हा केवळ धर्म नसून ती एक संस्कृती आहे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्ष पूर्ण करण्याची वाटचाल करत असताना मागील जवळपास शंभर वर्षे संघशक्तीला विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती आपल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्याने आता या संस्कृतीवर आघात करून आपली शक्ती कमजोर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने हिंदू शक्तीने आता सतर्क राहण्याची गरज असून सर्व शक्तीने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे असल्याने संघ व संघ विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
उत्सवाच्या वेळी प्रास्ताविक, परिचय केल्यावर मदतनिसांचे तसेच उपस्थित संघप्रेमी नागरिकांचे आभार राजुरा नगर कार्यवाह राकेश अल्लुरवार ह्यांनी मानले, कार्यक्रमाला स्वयंसेवकांसह संघप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.