ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुनोना गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार

जुनोना येथे माळी समाज भवन तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट

विविध विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचा मी प्रयत्न करीत आहे. जुनोना गावामध्ये ओपन जिम, बंदीस्त नाली बांधकाम, गावातंर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, सोलर हायमास्ट, संरक्षक भिंत, माळी समाज भवन आदी विकासकामे करण्यात आली आहेत. जात-पात, धर्म न पाहता गोरगरिब व कष्टकऱ्यांची सेवा केली. यापुढेही जुनोना गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून कार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जुनोना येथे माळी समाज भवन तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा नेते रामपाल सिंग, माळी समाजाचे अध्यक्ष विशाल लेनगुरे, सरपंच विवेक शेंडे, गंगाबाई देवगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘जुनोना गावातील विकासकामांसाठी अनेक निवेदने प्राप्त झाली होती. त्या निवेदनांचा स्वीकार करून विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या आशीर्वादाने जिल्ह्याची वेगवान प्रगती करता आली. जात-पात, धर्म न पाहता इतरांनी हेवा करावा असा विकास बल्लारपूर मतदारसंघाचा करण्यात आला.’

छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मानवधर्म पाळण्याचा प्रयत्न केला. त्याचदृष्टीने समाज घडविण्याचे कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला नाही. त्यांचे स्वराज्य हे केवळ एका जातीचे, घराण्याचे नव्हते, तर ते जनसामान्यांचे राज्य होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्याचे भाग्य मला लाभले, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘फिरते जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवून गरजूंना लाभ मिळवून देण्याचे काम करण्यात येणार आहे. गावाचा विकास थांबता कामा नये. गाव, प्रभाग, विभाग, तालुका आणि जिल्हा असेल हे वेगाने प्रगतीच्या मार्गावर जावे यासाठी सर्वांच्या आशीर्वादाची आवश्यकता असल्याची भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

गोरगरिब व शेतकऱ्यासांठी महत्वपुर्ण निर्णय

जिल्ह्यात 4 लाख 70 हजार लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर केले. शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र व राज्य शासनाचे मिळून 12 हजार रुपये थेट देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 202 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वाटप करण्यात आले. घरकुलाच्या बाबतीत जिल्हा मागे पडू नये यासाठी अनेक निर्णय करण्यात आले असून रमाई व शबरी आवास योजनेतील अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली. ओबीसी समाजासाठी मोदी आवास योजनेत घरकुले वाढविण्याचा निर्णय केला. येत्या काळात मतदारसंघात बेघर किंवा भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीला घरकुल उपलब्ध होईल. तसेच ज्याच्यांकडे जमीन नाही अशांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेअंतर्गत 1 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकार गोरगरिब व कष्टकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये